गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीक्षेपक आणि ध्वनिवर्धक यांच्या वापराबाबतच्या कालमर्यादेची यादी सोमवारी प्रशासनाकडून जाहीर केली. यानुसार गणेशोत्सवाच्या काळात चार दिवसांसाठी मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिक्षेपक वापराबाबतच्या नियमांमुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आज प्रशासनाकडून याबाबतचा खुलासा करण्यात आलेला आहे. यादीत नमूद केल्याप्रमाणे ६ तारखेला (दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन), ९ तारीख ( पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन), १० तारीख ( गौरी विसर्जन) आणि १५ तारखेला ( अनंत चतुर्दशी) मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार आहे. अन्य दिवशी रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. ध्वनिप्रदूषण वाढत असल्यामुळे काही वर्षांपासून रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईमध्ये ३६५ दिवसांपैकी १५ दिवस रात्री १० ऐवजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा मर्यादित आवाजामध्ये वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवातील या चार दिवसांची निवड गेल्या वर्षीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जात होती. त्याबाबतची सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पोलीस आयुक्तांना करण्यात येत होती आणि पोलीस आयुक्त कार्यालयाकडून स्थानिक पोलीस ठाण्यांना सूचित करण्यात येत होते. मात्र, या दिवसांची निवड करण्याचा अधिकार राज्य सरकारचा असून तो दुसऱ्या यंत्रणांना देता येत नाही. त्यामुळे शासनानेच या चार दिवसांची निवड करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते.