इंद्रायणी नार्वेकर

गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर चिनी मालावर आणि कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचे सत्र सुरू असले तरी मुंबईतील सागरी मार्ग प्रकल्प मात्र चिनी बनावटीच्या यंत्रानेच पूर्ण करावे लागणार आहे. हे यंत्र जोडण्यासाठी मात्र तेथील तंत्रज्ञांऐवजी भारतीय तंत्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे.

तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपन्यांची कंत्राटे रद्द करून चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एमएमआरडीएने मोनोरेल खरेदी निविदा प्रक्रियेतून दोन चिनी कंपन्यांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गाच्या कामात चिनी कंपन्यांना दूर ठेवणार का? हा प्रश्न होता.

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे वरळीकडील टोक या दरम्यान ९.९८ किमीचा सागरी रस्ता बांधण्यात येणार आहे. त्यात ३.४५ किलो मीटरचे दोन समांतर बोगदे खणण्यात येणार आहेत. हे बोगदे खणण्यासाठी खास चीनहून यंत्र आणण्यात आले आहे.

ऑक्टोबर अखेर याच यंत्राने बोगदा खणण्याचे काम प्रत्यक्षात सुरू होईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

खटल्यामुळे सागरी मार्गाचे काम सहा महिने पूर्णत: थांबले होते. त्यानंतर टाळेबंदीमुळे हे काम रखडले होते. सागरी मार्गाचे काम ज्या कंपन्यांना देण्यात आले आहे त्यात चिनी कंपन्या नाहीत. तीन टप्प्यांपैकी प्रिन्सेस स्ट्रीट ते बरोडा पॅलेसच्या दोन टप्प्यांचे काम एलएण्डटी कंपनी कडे आहे तर बरोडा पॅलेस ते वरळी सागरी सेतू या एका टप्प्याचे काम एचसीसी कंपनीला दिले आहे. दक्षिण कोरियातील एका कंपनीशी या कंपनीची भागीदारी आहे. त्यामुळे या कामात चीनबरोबर कोणताही करार केलेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सागरी महामार्ग प्रकल्पामध्ये चीनशी कोणत्याही प्रकारचा करार करण्यात आलेला नाही.  केवळ बोगदा खणण्यासाठी जे मशीन आणले आहे ते चीनहून आणलेले आहे. हे यंत्र जोडण्यासाठी चीनच्या किंवा सिंगापूरच्या तज्ज्ञांची मदत घ्यावी लागणार होती. मात्र त्याकरितादेखील आम्ही देशातील तज्ज्ञांचीच मदत घेणार आहोत.

विजय निघोट, प्रमुख अभियंता, सागरी किनारा मार्ग