ईद ए मिलादच्या निमित्ताने येत्या २४ तारखेला राज्यात मद्यविक्रीवर बंदी घालावी की नाही, यावरून राज्याचे महसूल खाते पेचात सापडले आहे. राज्यातील मुस्लिम समाजातील आमदारांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ईदला मद्यविक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी नाताळ असल्याने मद्यविक्री करावी की नाही, यावरून सरकार पेचात सापडले आहे.
याबद्दल खडसे म्हणाले, ईद ए मिलादच्या निमित्ताने मद्यविक्रीवर बंदी घालण्याची मागणी पहिल्यांदाच राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. आतापर्यंत कोणत्याच आमदाराने किंवा व्यक्तीने अशी मागणी सरकारकडे केली नव्हती. एका बाजूला मुस्लिम समाजातील नेत्यांनी जी मागणी केली आहे. त्यांच्या भावनांचा राज्य सरकार पूर्णपणे आदर करते. त्याचवेळी दुसऱ्या दिवशी नाताळ असल्याने सरकारला त्याचाही विचार करावा लागणार आहे. दोन्ही समाजांचा विषय असल्यामुळे काय निर्णय घ्यावा, यावरून सरकार पेचात सापडले आहे.
मद्यविक्रीवर बंदी घालायची की नाही, यावर अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. येत्या एक किंवा दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे खडसे यांनी स्पष्ट केले.