‘आम आदमी पार्टी’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीने गुरुवारी तडकाफडकी महाराष्ट्र कार्यकारिणी, मुंबई विभागीय समिती आणि जिल्हा समित्या बरखास्त केल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील ‘आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

नवी दिल्लीमधील ‘आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी माजल्यामुळे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये गोंधणाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘आप’च्या केंद्रीय कार्यकारिणीने गुरुवारी अचानक महाराष्ट्राची कार्यकारिणी बरखास्त केली. त्याचबरोबर मुंबई विभागीय समिती आणि जिल्हा समित्याही बरखास्त करण्यात आल्या. केंद्रीय कार्यकारिणीने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रातील ‘आप’च्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी केंद्रीय कार्यकारिणीने महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना त्याची कल्पनाच दिली नव्हती. त्यामुळे कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत, असे ‘आप’चे महाराष्ट्रातील नेते मयांक गांधी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.