मुंबई : बंदी घालण्यात आलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या संघटनेच्या ७ संशयीत सदस्यांना मुंबई आणि कल्याण परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी रात्री ही कारवाई केली. १६ जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एटीएसकडून या संशयितांची अधिक चौकशी करण्यात येत आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एक नक्षलवाद्यांचा गट येणार असल्याची माहिती एटीएसला शुक्रवारी १२ जानेवारी २०१८ रोजी अत्यंत विश्वासू खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार एटीएसच्या पथकाने तत्काळ कल्याण स्टेशनवर धाव घेतली आणि खबऱ्यांकडून खात्री झाल्यानंतर ७ संशयीत नक्षलवाद्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान एटीएसकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना ते समाधानकारक उत्तरे देत नव्हते असे एटीएसच्या सुत्रांकडून कळते.

या चौकशीत त्यांच्याकडून काही प्राथमिक माहिती मिळाली असून त्यानुसार, हे सातही जण मुंबईतील कामराजनगर, रमाबाई आंबेडकर नगर आणि विक्रोळी परिसरात सीपीआय (एम) या बंदी आणलेल्या संघटनेसाठी काम करीत असल्याचे कळते. या माहितीनंतर एटीएसकडून तत्काळ संबंधीत ठिकाणांवर छापे मारण्यात आले. यामध्ये पोलिसांना त्यांच्या घरात नक्षलवादी कारवायांसाठी प्रेरणा देणारे काही आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. त्यामुळे ताब्यात घेण्यात आलेले लोक हे सीपीआयचे सक्रीय कार्यकर्ते असल्याचे एटीएसने म्हटले आहे. दरम्यान, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) त्यांच्यावर काळाचौकी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.