शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधिमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी आता शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कालपर्यंत अर्थसंकल्प सादर करून देणार नाही, असे म्हणणारे शिवसेनेचे वाघ शांत कसे झाले, असा खोचक सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केला.

कर्जमाफीच्या मुद्द्यावर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत गेले होते. कर्जमाफीबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत या भेटीबाबत निवेदन केले. मुख्यमंत्री सभागृहात निवेदनासाठी उभे राहिले तेव्हापासूनच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली. त्यावरून विरोधकांना कर्जमाफीत नव्हे तर केवळ राजकारणात रस असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला शेतीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. सध्याच्या घडीला राज्यातील ३१ लाख शेतकरी कर्जबाजारी आहेत. कर्जबाजारी असल्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळणे शक्य नाही. या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे हे खरे असली तरी शेती क्षेत्रात मुलभूत सुधार करणे गरजेचे आहे. अन्यथा केवळ कर्जमाफी करून काहीही साध्य होणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने शेती क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीमुळे राज्याच्या कृषी क्षेत्राचा विकास दर अभूतपूर्व वाढला आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर आपण सभागृहात बसून शांतपणे अर्थसंकल्प ऐकणार असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. शेतकरी कर्जमाफीबाबत शिवसेनेचे दुटप्पी धोरण आहे. अर्थसंकल्प मांडू देणार नाही असे कालपर्यंत म्हणणारे शिवसेनेचे वाघ शांत कसे झाले, असा सवाल मुंडे यांनी केला आहे.

‘शेतकऱ्याच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; हत्येचा गुन्हा दाखल करा’

शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी दोन्ही सभागृहांत सरकारला धारेवर धरले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कडक शब्दांत टीका केली. शिवसेना सत्तेत राहून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राजकारण करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या निवेदनामध्ये कर्जमाफीबद्दल काहीही नाही, असे मुंडे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवेदनामुळे हताश होऊन औरंगाबादमधील विष्णू बुरकूल या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असून, सरकारविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली.