राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकासआघाडी सरकारचा दुसरा आणि करोना काळानंतरचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला. त्यामुळे या अर्थसंकल्पावर मोठी चर्चा सध्या सुरू झाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर ‘मुंबईचा अर्थसंकल्प’ अशी टीका केली आहे. तर दुरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाचं आणि अजित पवारांचं कौतुक केलं आहे. “परिस्थितीचं रडगाणं न गाता सादर केलेला हा अर्थसंकल्प आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

“आपल्याला अपेक्षित येणं किती होतं आणि प्रत्यक्षात आलं किती याची आकडेवारी सांगितली आहेच. पण केंद्र सरकारकडून किती येणं आहे हे देखील सगळ्यांना माहिती आहे. पण रडगाणं न गाता आर्थिक परिस्थितीचा सामना करत समाजातल्या सर्व थरांना आधार देणारा आणि त्याच बरोबरीने राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सरकारच्या वतीने अर्थमंत्र्यांनी मांडला आहे. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो”, असं उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

“प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक समाज, समाजातला प्रत्येक घटक यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद आहे. महिलांना स्वत:च्या पायावर स्वाभिमानाने उभं करणं हे आमचं कर्तव्य आहे. प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातून अर्थसंकल्पाकडे पाहू शकतो. तो त्यांचा अधिकार आहे”, असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

हे महाराष्ट्राचं बजेट की मुंबई महापालिकेचं बजेट?; फडणवीसांची ठाकरे सरकारला विचारणा