१० रुपयात थाळी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील गोरगरीब जनतेसाठी १० रुपयात शिवभोजन उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये ६ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भातले ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

कशी असेल १० रुपयांची थाळी?

३० ग्रॅमच्या दोन पोळ्या
१०० ग्रॅम भाजीची वाटी
१५० ग्रॅम मूद असलेला भात
१०० ग्रॅम वरण

१० रुपयांमध्ये मिळणाऱ्या थाळीत दोन पोळ्या, भाजी, वरण आणि भात यांचा समावेश असणार आहे. या थाळीला शिवभोजन असे नाव देण्यात आले आहे.

सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ५० ठिकाणी हे शिवभोजन मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात १० रुपयांच्या थाळीची घोषणा केली होती. मुंबई महापालिकेत ही थाळी काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आली होती. जी फक्त पालिका कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठीच होती. त्यानंतर ही थाळी सर्वसामान्यांना कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता शिवभोजन योजनेला म्हणजेच १० रुपयात थाळी मिळण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्यामुळे लवकरच ही थाळी सामान्यांसाठीही उपलब्ध होणार आहे.