शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांची मागील 25 वर्षे युती आहे. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात आणि देशात एकत्रच वावरले आहेत. काही मुद्द्यांवर आपसात मतभेद झाले आहे. मात्र दोन्ही पक्ष हिंदुत्त्ववादी पक्ष आहेत त्यामुळे आमचा मूळ विचार सारखाच आहे. म्हणूनच इतके वर्षे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एकत्र राहिलो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मागच्या विधानसभेच्या वेळी काही कारणांमुळे आम्ही एकत्र राहू शकले नाही. मात्र राज्यात युतीचं सरकार आणि केंद्रात एनडीएचं सरकार आम्ही एकत्रितपणे चालवत आहोत. सध्या काही पक्ष एकत्र येऊन काही आम्हाला विरोध करत आहेत. अशात आम्ही एकत्र यावं ही जनभावना होती तो कौल आम्ही मान्य केला आहे. लोकसभा आणि विधानसभेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.

सामान्य माणसांचं, तळागाळातल्या लोकांचं, शेतकरी बांधवांचं हित राखण्यासाठी आम्ही घेतला आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येत लवकरात लवकर झालंच पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती जी आम्ही मान्य केली आहे. लोकसभेसाठी शिवसेना 23 जागा तर भाजपा 25 जागा लढवेल. तर विधानसभेसाठी आम्ही मित्रपक्षांशी चर्चा करू, त्यांना जागा सोडल्यानंतर ज्या जागा उरतील त्या जागा आम्ही अर्ध्या अर्ध्या वाटून घेऊ असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. तसेच पुन्हा एकदा जनता आम्हालाच कौल देईल असाही विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.