मॅनेजमेंट गुरु अशी उपाधी मिळालेल्या मुंबईच्या डबेवाल्यांना आता त्यांच्या हक्काची घरं मिळणं शक्य होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात एक बैठक पार पडली. या बैठकीत डबेवाल्यांच्या घरांच्या मागणीबाबत चर्चा झाली. ज्यानंतर मुंबईतल्या डबेवाल्यांना घरं दिली जातील असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. तसेच संबंधित विभागांना त्यासाठीचे निर्देशही दिले. त्यामुळे आता मुंबईतील डबेवाल्यांच्या घरांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मुंबईतल्या डबेवाल्यांना घरं उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचं ट्विटही अजित पवार यांनी केली आहे. आज झालेल्या बैठकीत मुंबईतील डबेवाला संघटनेचे पदाधिकारी, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते. गेल्या १३० वर्षांपासून सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांचं कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातले पर्यटक, अभ्यासक येतात. त्यांच्या कामकाजाची हक्काची जागा असायला हवी त्यासाठी डबेवाला भवनाचा प्रश्नही मार्गी लावू असंही आश्वासन अजित पवार यांनी दिलं.

ब्रिटनच्या राजघरण्यानेही डबेवाल्यांचं कौतुक केलं होतं. मुंबईत पाच हजार डबेवाले कार्यरत आहेत. दोन लाख डबे घरातून चाकरमान्यांपर्यंत पोहचवण्याचं काम डबेवाले करतात. गेल्या अनेक दिवसांपासून या डबेवाल्यांची घरांची मागणी होती. त्या प्रश्नावर आज चर्चा करण्यात आली. त्यानंतर याबद्दलचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.