देवस्थान ताब्यात घेण्यासाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यतील शनि शिंगणापूर (ता. नेवासा) येथील श्रीशनैश्वर मंदिर आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार सध्याच्या सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करून नवीन अधिनियमाद्वारे शनैश्वर देवस्थान राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या प्रस्तावास बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याबरोबरच भाविकांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय राज्य  मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत या कायद्याच्या मसुद्यालाही मान्यता देण्यात आली असून आगामी पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार आहे.

शनैश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. मात्र तेथे येणाऱ्या भाविकांसाठी कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. तसेच या मंदिराच्या विश्वस्त मंडळाने अनेकवेळा मोठय़ा प्रमाणात  गैरव्यवहार केला असून सध्याच्या  विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवरूनही वाद निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे शनिच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यावरूनही मध्यंतरी विश्वस्त आणि समाजिक कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. या सर्व घटनांची गंभीर दखल घेत हे मंदिरच सरकारच्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन कायद्यामुळे श्रीशनैश्वर देवतेच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा जपून दर्शन व्यवस्थेबाबत एकसंघता आणता येणार आहे, तसेच भाविकांनी देवतेच्या चरणी दान केलेल्या निधीतून भक्तांसाठी अधिक व्यापक सोयी-सुविधा निर्माण करण्यात येतील. त्याचबरोबर अतिरिक्त निधीतून समाजोपयोगी शैक्षणिक आणि वैद्यकीय कार्य करता येईल. या कायद्यानुसार नवीन विश्वस्तमंडळ नियुक्त करण्याचे तसेच स्थावर आणि जंगम मालमत्तेचे अधिकार राज्य सरकारकडे राहतील.