बनावट नोटांच्या तस्करीचा विचार केला तर २०१५ सालच्या राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार २०१२ ते २०१४ या कालावधीत मोठय़ा प्रमाणावर बनावट नोटा जप्त करण्यामध्ये दिल्लीनंतर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर होता. पोलीस, अन्य तपास यंत्रणा आणि रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) २०१२ ते २०१४ या कालावधीत १२५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. तर ३ हजार ६५६ जणांना अटक करण्यात आली होती.

२०१२ ते २०१४ या कालावधीत राज्यातून १४.५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या, तर ७०२ बनावट नोटांच्या तस्करीचे गुन्हे दाखल करण्यात आले व ५६१ आरोपींनी अटक करण्यात आली. तामिळनाडूमध्ये बनावट नोटांच्या तस्करीचे सर्वाधिक म्हणजेच ७३५ गुन्हे नोंद करण्यात आले. दिल्लीमधून ४०.३ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या,

अहवालानुसार, २०१४ मध्ये राज्यातून एक हजार रुपयांच्या सर्वाधिक ३५ हजार ३५७ नोटा जप्त करण्यात आल्या. २०१२ साली जप्त करण्यात आलेल्या नोटांच्या तुलनेत या तिपटीने जास्त होत्या. २०१२ मध्ये आरबीआय आणि पोलिसांनी १२ हजार ८१७ बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्याचप्रमाणे २०१४ मध्ये पाचशे रुपयांच्या ४६ हजार २६३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. हा आकडाही २०१२ मध्ये जप्त करण्यात आलेल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटांच्या तुलनेत दुप्पट होता.

या प्रकरणांचा तपास प्रामुख्याने सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या तपास यंत्रणांकडून करण्यात येतो.  या बनावट नोटांची तस्करी प्रामुख्याने बांगलादेशमार्गे मुंबईत वा देशात अन्यत्र केली जाते.  बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्याकरवी या नोटा बाजारात आणल्या जातात. तसेच घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी वापरून त्याचे वितरण केले जाते. त्यामुळे अशा व्यक्तींपर्यंत पोहोचणे अशक्य असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.