इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या (आयबीबीएफ) मान्यतेने बेळगाव येथे पार पडलेल्या ‘सतीश शुगर क्लासिक २०१६’ शरीरसौष्ठव स्पध्रेत महाराष्ट्रमने सांघिक जेतेपद पटकावले. महाराष्ट्राने या स्पध्रेत दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्यपदकाची कमाई केली. बी. महेश्वरन (८५ किलो) व सागर कातुर्डे (७५ किलो) यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकले. रोशन तटकरे (५५ किलो), नितीन म्हात्रे (६० किलो), जगदीश लाड (९० किलो) व महेंद्र चव्हाण (९० ते १०० किलो) यांनी रौप्य, तर ७० किलो वजनी गटात संतोष भरंकरने कांस्यपदक पटकावले. या स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान उत्तर प्रदेशच्या यतींदर सिंगने, तर सर्वोत्तम पोझरचा मान सीआरपीएफच्या बारून युम्नामने पटकावला. महिला गटात मणिपूरच्या सरीता देवीने सुवर्ण जिंकले. महाराष्ट्राच्या सिबलिका सहा व लिला हरी फड यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान पटकावले.

मुंबई अजिंक्य
नाशिक : मुंबई जिल्हा (१७ वर्षांखालील) संघाने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा फुटबॉल अजिंक्यपद स्पध्रेचे जेतेपद पटकावले. टायब्रेकरमध्ये रंगलेल्या अंतिम लढतीत मुंबईने ४-१ अशा फरकाने पुणे जिल्ह्यावर विजय मिळवला. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. १३ व्या मिनिटाला मुंबईसाठी अर्फत अन्सारीने पहिला गोल नोंदवला. पुण्याकडून कडवा संघर्ष पाहायला मिळाला. एडवीन फलॅरोने फ्री किकवर गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. मुंबईच्या अर्फत अन्सारीला स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडू, तर मुंबईच्याच मुसद्दीक खानला सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले.