01 October 2020

News Flash

विधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक

दुष्काळ व अन्य प्रश्नी आक्रमक भूमिका घेत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.

संग्रहित छायाचित्र

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दुष्काळ व अन्य प्रश्नी आक्रमक भूमिका घेत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी आणि पाण्याचे टँकर व अन्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ‘फडणवीस सरकार का अजब खेल, सस्ती दारु महंगा तेल’ अशा घोषणांनी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. तेव्हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकप्रस्तावाचे कामकाज होणार असल्याचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले व गोंधळ थांबविला. विरोधकांकडून मंगळवारी दुष्काळप्रश्नी सभागृहाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणासाठी शिवसेनेची घोषणाबाजी

विरोधकांबरोबरच सत्ताधारी शिवसेना सदस्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी सोमवारी घोषणाबाजी केली. मराठा समाजाने राज्यभरात शांततेने अनेक मोर्चे काढले. आता घटनात्मक व न्यायालयात टिकेल, असे आरक्षण द्या, अशी मागणी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, डॉ. सुदीप मिणचेकर आदींनी केली. शिवसेनाही विरोधी पक्षांच्या बरोबरीने मराठाप्रश्नी सरकारला अडचणीत आणण्यासाठी पूर्णपणे तयारीत असल्याची झलकच शिवसेना आमदारांनी यानिमित्ताने दाखविली.

मुस्लिमांनाही  आरक्षण हवे

मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची तयारी नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिले होते आणि उच्च न्यायालयाने शैक्षणिक आरक्षण वैध ठरविले होते. तरीही भाजप नेतृत्वाखालील सरकारने मुस्लिमांना आरक्षण नाकारले, याबद्दल नाराजी व्यक्त करीत काँग्रेस आमदार नसीम खान यांनी मुस्लिमांनाही पाच टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी केली. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, ही राज्य सरकारची भूमिका चुकीची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले व मुस्लीम समाज त्याबद्दल नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील  यांची दिलगिरी

विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे १२ नोव्हेंबर २०१८ रोजी निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊ न शकल्याने महसूलमंत्री व सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिलगिरी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. कॉम्रेड गायकवाड यांच्या निधनानंतर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मुख्यमंत्री व राजशिष्टाचार विभागास कळविले होते. पार्थिवावर अंत्यसंस्कार १३ नोव्हेंबरला होणार होते. त्याच दिवशी सकाळी मुख्यमंत्री कार्यालयाकडून सकाळी ११.२० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची सूचना केली. अंत्ययात्रा सुरू होती व पोलीस पथक पोचण्यासाठी दोन तास लागणार होते. त्यामुळे प्रांत अधिकाऱ्याने गायकवाड यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली व शासनाच्या वतीने पुष्पचक्र वाहिले, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

वाजपेयी यांना विधिमंडळात आदरांजली

मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे राजकीय साधनशुचिता बाळगणारे नेते होते. त्यांनी कायमच देशाच्या विकासाचा ध्यास बाळगला. विविध विचारधारांचे कायमच स्वागत करत त्यांनी लोकशाहीला उंची गाठून दिली. त्यामुळे अटलजींना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना काढले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी मंत्री आनंदराव नारायण देवकाते, माजी राज्यमंत्री वसंतराव रामराव धोत्रे, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधानसभा सदस्य कॉम्रेड माधवराव गायकवाड तसेच विधानसभा सदस्य केशवराव आत्माराम पारधी, वासुदेव आनंदराव देशमुख, शिवाजीराव नारायणराव नागवडे, वैजनाथराव यादवराव आकात, यादवराव कृष्णराव भोयर, लक्ष्मणराव विठोबा जाधव, वसंतराव विठोबा थोरात, विठ्ठलराव सहादू भैलुमे, वसंतराव बालाजीपंत इटकेलवार आणि विमल खंडेराव रांगणेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोक प्रस्ताव मांडला. त्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत अटलजींसह सर्व नेत्यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 3:39 am

Web Title: maharashtra winter session 2018 winter session of maharashtra legislature
Next Stories
1 राज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे
2 ‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’
3 आधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय?
Just Now!
X