देशभरातील मेल-एक्स्प्रेस, मुंबई उपगनरीय लोकल सेवा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे मंगळवारी रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल आणि विशेष रेल्वेगाडय़ा मात्र धावू शकतील. त्यामुळे सामान्यांसाठी लोकल बंदच राहणार आहे.

जून २०२० मध्ये देशभरातील रेल्वे सेवा आणि उपनगरीय लोकल १२ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश होते. ही मुदत संपण्याच्या एक दिवस आधी रेल्वे बोर्डाने नियमित धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाडय़ा आणि लोकल सेवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचे आदेश काढले. सध्या देशभरात २३० विशेष रेल्वेगाडय़ा धावत आहेत. याशिवाय मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीही लोकल सुरु आहेत. राज्य सरकारच्या मागणीनुसार त्या सुरुच राहतील,असे स्पष्ट केले. सोमवारी उत्तर रेल्वे विभागाला दिलेल्या आदेशाची एक प्रत समाजमाध्यमांवर फिरली. यात ३० सप्टेंबपर्यंत लोकल, रेल्वेगाडय़ा बंद राहतील, अशी माहिती होती. परंतु ही प्रत बनावट असल्याचे रेल्वे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी बोर्डाने नव्याने आदेश जारी केले.