सरकार दरबारी नोंद नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला-उबेर या खासगी टॅक्सींविरोधात २६ जुलैला जय भगवानदादा महासंघाने पुकारलेल्या संपात शहरातील अन्य संघटना सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ओला आणि उबेर टॅक्सींबाबत राज्य सरकारशी चर्चा सुरू असताना केवळ प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नसल्याची भूमिका अन्य युनियने घेतली आहे.

काळ्या-पिवळ्या टॅक्सीप्रमाणे खासगी टॅक्सी समन्वयकांना नियमावली लागू करावी, ही प्रमुख मागणी घेऊन महासंघाने मंगळवारी संप पुकारला आहे. या संपात ९० टक्के रिक्षा-टॅक्सी चालक  सहभागी होणार असल्याचा दावा महासंघाने केला आहे. मात्र या संपाला मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे महासचिव ए. एल. क्वाड्रोस, मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे शशांक राव आणि स्वाभिमानी टॅक्सी युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी पाठिंबा नसल्याचे सांगितले आहे.

गेल्या महिन्यात २१ जूनला जय भगवानदादा महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदान येथे आंदोलने केले होते. या आंदोलनाचा फटका मुंबईकरांना बसला होता. यावेळी शहरात अचानक उद्भवलेल्या महासंघाचा बोलबाला झाला होता. त्यावेळी ओला, उबेरच्या मुद्यावर रिक्षा टॅक्सी चालक कोणाही संघटनेचा झेंडा हाती घ्यायला तयार झाले असल्याचे जाणकार सांगत होते. हीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.