मुंबईतील भायखळा येथे शुक्रवारी सकाळी नूर मंजिल या रहिवाशी इमारतीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशामन दलाला यश आले. मात्र, या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येते. भायखळा रेल्वे स्टेशनच्या परिसरात असणाऱ्या या इमारतीला आज सकाळी आग लागली आणि बघता बघता या आगीने उग्र स्वरुप धारण केले. या घटनेची वर्दी मिळताच अग्निशामन दलाची आठ फायर इंजिन्स आणि पाण्याचे चार टँकर्स घटनास्थळी रवाना झाले होते. त्यानंतर तब्बल तासभर शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामन दलाला यश आले. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी येथील लाकडी सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजूनपर्यंत समजलेले नाही.