केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे ‘नोटा’ हा विषय सध्या चच्रेच्या केंद्रस्थानी आहे. नवीन नोटा एटीएममध्ये भरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी एटीएम बंद आहेत, तर सुरू असलेल्या एटीएमसमोर भल्यामोठय़ा रांगा आहेत. बँकांमधूनही पैसे काढण्यासाठी ग्राहकांना रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या पाश्र्वभूमीवर एकूणच सर्वसामान्यांच्या आयुष्यात ‘चलन’कल्लोळ करणाऱ्या या नोटा कधी, कुठे, कशा, केव्हा आणि कोणाकडून छापल्या जातात? नोटा छापण्यामागचे सरकारचे धोरण काय? असे आत्तापर्यंत न पडलेले प्रश्न लोकांच्या मनात पिंगा घालत आहेत. या नोटा छापून एटीएम किंवा बँकांपर्यंत पोहोचवण्यामागे अर्थातच, केंद्र सरकार, ‘रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया’, ‘सिक्युरिटी िपट्रिंग अ‍ॅण्ड िमटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ यांची अतिशय महत्त्वाची भूमिका असते.

  1. नवीन वर्षांच्या सुरुवातीला आणि आíथक वर्ष सुरू होण्याआधी ‘भारतीय रिझव्‍‌र्ह बँक’ देशाची वार्षिक चलनरोखीची गरज, व्यवहारात असलेल्या नोटा, नष्ट करण्यात आलेल्या नोटांचा आकडा आणि बदली करण्यासाठी आवश्यक असलेल्या नोटांचा आकडा या सगळ्या गोष्टींचा आढावा घेते.
  2. या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर देशाचा अपेक्षित विकास दर नजरेसमोर ठेवून येणाऱ्या आर्थिक वर्षांतील महागाई दर आणि त्याआधीच्या वर्षांत झालेल्या इलेक्ट्रॉनिक व्यवहाराचे प्रमाण या सगळ्याचा विचार केला जातो.
  3. त्यासंबंधीची माहिती बँकेच्या १९ प्रादेशिक कार्यालयांमधून एकत्रित केली जाते. त्यानंतर किती नोटांची छपाई करायची, याचा निर्णय घेतला जातो. नोटांच्या छपाईचा आकडा केवळ रिझव्‍‌र्ह बँक आणि अर्थ मंत्रालय यांच्यात गुप्त ठेवला जातो.
  4. नोटांच्या छपाईसाठी लागणाऱ्या उच्च दर्जाच्या सुरक्षित कागदाची निर्मिती, रचना आणि पुरवठा हा म्हैसूरमधील ‘रिझव्‍‌र्ह बँके ’ची मालकी असलेल्या ‘करन्सी पेपर मिल’ आणि केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश येथील होशंगाबाद मिलमधून केला जातो. दोन्ही पेपर मिल्सची वार्षकि कागदनिर्मिती क्षमता जवळपास अठरा हजार मेट्रिक टन आहे. गरज पडल्यास कागदाची आयातही केली जाते.

नोटांची सुरक्षा वैशिष्टय़े

म्हैसूर आणि होशंगाबाद येथेच नोटांसाठी तयार झालेल्या कागदावर नोटांच्या सुरक्षिततेसाठी मल्टिटोनल, थ्री डायमेन्शनल वॉटरमार्क, मायक्रोलेटरिंग आणि सिक्युरिटी थ्रेड्स मुद्रित केले जातात. संशोधकांचे एक पथक सातत्याने या नोटांच्या सुरक्षिततेबद्दलच्या गोष्टी मुद्रित केल्या आहेत की नाहीत, यावर लक्ष ठेवून असते. अशा पद्धतीने सुरक्षिततेच्या सगळ्या बाबी पूर्ण करून तयार झालेला नोटांचा कागद पुढील छपाईसाठी तयार होतो.

नोटांची प्रत्यक्ष छपाई

म्हैसूर आणि होशंगाबाद येथून तयार होऊन आलेला नोटांचा कागद पुढील छपाईसाठी म्हैसूर, सालबोनी, देवास आणि नाशिक येथील चार प्रिंटिंग प्रेसमध्ये पाठवला जातो. तिथे ऑप्टिकली व्हेरिअबल इंकचा वापर केला जातो. युरोपमध्ये या नोटांच्या संरचनेला अंतिम स्वरूप देण्यास किमान एक वर्ष लागते; पण आपल्याकडे चलनात आणलेल्या मोठय़ा मूल्यांच्या नोटांची रचना सहा महिन्यांत झाली आहे. नोटांची छपाई करताना कागदाच्या एका शीटमध्ये त्या बसवल्या जातात. यात आताच्या चलनातील दोन हजारच्या चाळीस नोटा बसतात. त्या चाळीस नोटांची छपाई झाल्यावर त्यावर टेलिस्कोपिक नंबिरग केले जाते आणि मग त्या कापल्या जातात. एका पाकिटात शंभर नोटा आणि अशा दहा पाकिटांचे मिळून एक बंडल तयार करण्यात येते.

छपाईनंतर एटीएमपर्यंत

नोटा छपाईनंतर रिझव्‍‌र्ह बँकेच्या देशभरातील १९ कार्यालयांमधून या वितरित केल्या जातात. ज्या ठिकाणी रिझव्‍‌र्ह बँकेची कार्यालये नसतील तिथे चार हजार चलन पेटय़ांच्या माध्यमातून या नोटा वितरित केल्या जातात.  दुर्गम प्रदेशांत हेलिकॉप्टर आणि विमानातून नोटांचे वितरण केले जाते. मात्र चलन पेटय़ांमध्ये आलेल्या या नोटांना काहीच मूल्य नसते, तो एक छापील कागद असतो. त्या बँकेत आल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेला तेवढय़ाच मूल्याचे रोख, गव्हर्न्मेंट बाँड किंवा अन्य सिक्युरिटीजचा त्याला आधार द्यावा लागतो. त्यानंतरच त्या चलनी नोटा ठरतात. या चलनी नोटा बँक, एटीएममध्ये पोहोचवण्याचे सर्वात मोठे काम त्यानंतर सुरू होते.

एटीएमध्ये नोटा भरताना..

एका एटीएममध्ये चार ‘कंटेनर’ (कसेट्स) असतात. त्यात प्रत्येकी अडीच हजार नोटा भरता येतात. एका कंटेनरमध्ये एकाच मूल्याच्या नोटा भरण्यात येतात.  त्यातही पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटांवर बंदी असल्याने अनेक ठिकाणी दोनच कंटेनर भरले जात आहेत. परिणामी या एटीएममध्ये  पाच लाख रुपये एवढीच रक्कम असते . एका एटीएममध्ये तांत्रिक सुधारणा करण्यासाठी २० मिनिटे लागतात.