व्यवस्थापन अभ्यासक्रमातील प्रकार; नियमन प्राधिकरणाकडून चौकशी

व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमाला संस्थांच्या प्रवेश परीक्षांची खोटी गुणपत्रके देऊन जवळपास १७० विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवल्याचे समोर आले असून प्रवेश नियमन प्राधिकरणाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे (एमबीए / एमएमएस) प्रवेश हे राज्याच्या पातळीवरील प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून होतात. मात्र अखिल भारतीय कोटय़ातील प्रवेश हे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या माध्यमातून होतात.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा (कॅट), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात येणारी परीक्षा (सीमॅट) यांव्यतिरिक्त व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थांच्या संघटनाही काही परीक्षा घेतात. या परीक्षांचे गुण नोंदवून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यातील काही विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम ९९ पर्सेंटाइल दिसत असल्यामुळे अनेक नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या सर्व प्रकरणाची तक्रार आल्यानंतर प्रवेश नियमन प्राधिकरणाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. साधारण १७० विद्यार्थ्यांनी संघटनांच्या परीक्षांचे गुण दाखवून प्रवेश मिळवल्याचे दिसत आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी तर परीक्षाही दिली नसल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे खासगी परीक्षा दिलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची चौकशी आणि गुणांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. पडताळणी सुरू केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी कागदपत्रे सादरच केलेली नाहीत. ज्या विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी होणार नाही, त्यांना प्रवेश यादीतून बाहेर काढण्यात येईल,’ असे प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

परीक्षांमध्ये गोंधळ काय?

सीईटी, कॅट, सीमॅट यांशिवाय तीन ते चार खासगी प्रवेश परीक्षा आहेत. या परीक्षा वर्षांतून अनेकदा घेतल्या जातात. अगदी प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यातही संघटना या परीक्षा घेतात. अनेकदा घेण्यात येणाऱ्या या परीक्षांचे गुण, त्याची वैधता यांबाबत गोंधळ होतो. या परीक्षांमध्ये एकसमानताही नाही, त्याचा फटकाही विद्यार्थ्यांना बसतो. सध्या गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या खासगी संस्थांची परीक्षा दिल्याचे सांगून गुणांची नोंद करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली नसल्याची माहिती दिली, असे प्रवेश नियमन प्राधिकरणातील सूत्रांनी संगितले.