देणेकऱ्यांचे पैसे द्यावे लागू नये, यासाठी मित्राच्या मदतीने स्वत:चीच लूटमार झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न त्याने केला. परंतु, त्याची ही डाळ पोलिसांच्या तपासकौशल्यापुढे शिजू शकली नाही..

माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवून एका गाडीसह १२ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची तक्रार माणगाव पोलिसांकडे दाखल झाली. रायगड जिल्ह्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ नवीन नाही. परंतु, गेल्या काही दिवसांत पोलिसांनी अनेक दरोडेखोर टोळय़ांच्या मुसक्या आवळल्याने दरोडय़ाच्या घटना कमी झाल्या होत्या. अशात रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या या लूटमारीच्या घटनेने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील संदीप दरेकर हे मुंबईत खोली विकत घेण्यासाठी १ मार्चला आले होते. मात्र मुंबईत ज्यांची खोली घ्यायची आहे ती व्यक्तीच तेथे हजर नव्हती. त्यामुळे घर खरेदीसाठी देण्याकरिता वायद्याची रक्कम म्हणून आणलेली सात लाख रुपयांची रोकड घेऊन संदीप दरेकर पुन्हा खेडकडे निघाले. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि खराब रस्ता टाळण्यासाठी त्यांनी खालापूर-पालीमार्गे माणगावकडे जाण्याचा मार्ग निवडला. परंतु, भाले ते चांदवाडीदरम्यान त्यांच्या गाडीचा दोन मोटारसायकलनी पाठलाग सुरू केला. दोन्ही मोटारसायकलवर प्रत्येकी दोघेजण बसले होते. आपला पाठलाग होतोय, हे लक्षात येण्यापूर्वीच या चौघांनी मोटारसायकली आडव्या उभ्या करून दरेकर यांची गाडी अडवली. त्यानंतर दरेकर यांना मारहाण करून त्यांच्याकडील दोन सोन्याच्या साखळय़ा, मनगटी घडय़ाळ, पैशांचे पाकीट तसेच सात लाखांची रोकड आणि मोबाइल काढून घेण्यात आले. त्यानंतर दरोडेखोरांनी दरेकर यांचीच गाडी घेऊन पळ काढला. याप्रकरणी संदीप दरेकर यांच्या तक्रारीनंतर माणगाव पोलिसांनी भादंवी कलम ३९४, ३४१, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दरोडय़ाची घटना असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. आणि तातडीने तपास सुरू केला. गाडीचा शोध घेण्यासाठी एक पथक तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. फिर्यादीच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांचे दुसरे पथक मोबाइल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने दरेकर यांचा लंपास झालेला मोबाइल शोधण्याच्या कामाला लागले. त्यावेळी या मोबाइलचे लोकेशन ताम्हिणी घाटात असल्याचे आढळून आले. तातडीने ही गोष्ट पहिल्या पथकाला कळवण्यात आली व त्यांना ताम्हिणी घाटात धाडण्यात आले. तेथे हे पथक पोहोचले असता एका निर्जन स्थळी दरेकर यांची गाडी व्यवस्थित बंद केलेल्या तसेच हॅण्डब्रेक लावलेल्या स्थितीत आढळून आली.

दरोडेखोरांनी लूटमार करताना पळवून नेलेल्या गाडय़ा निर्जनस्थळी सोडल्याच्या अनेक घटना पोलिसांनी पाहिल्या होत्या. परंतु, या घटनेत गाडी अतिशय व्यवस्थितपणे बंद केल्याचे पाहून तपास अधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घाईत असलेले दरोडेखोर इतक्या शांतपणे गाडी पार्क करून कसे काय जाऊ शकतात, हा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला. त्यामुळे मग पोलिसांनी वेगळय़ा कोनातून तपास सुरू केला. दरोडा झाला त्या वेळेदरम्यान परिसरातील मोबाइल मनोऱ्यांच्या परिक्षेत्रात आलेल्या मोबाइल क्रमांकांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्याची सूचना करण्यात आली.

दरम्यान, दरोडय़ाच्या घटनेनंतर फिर्यादी संदीप दरेकर यांनी एका सार्वजनिक टेलिफोन बूथवरून आपल्या एका मित्राला फोन करून त्याला आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती दिल्याचे पोलिसांना सांगितले होते. या मित्राचा मोबाइल क्रमांकही ताम्हिणी घाटात असल्याचे तेव्हा आढळले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळवला. त्यांनी दरेकर यांच्या मित्रालाच ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच या मित्राने आपणच हे कृत्य केल्याचे कबूल केले. त्याचवेळी हा सगळा बनाव दरेकर यांच्या सांगण्यावरूनच केल्याचे त्याने सांगताच पोलिसांना साऱ्या प्रकरणाचा उलगडा झाला.

दरेकर यांच्या डोक्यावर कर्ज होते. देणेकरी आपले पैसे परत मिळवण्यासाठी तगादा करत होते. त्यामुळे दरेकर यांनी मित्राच्या मदतीने दरोडय़ाचा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले. दरेकर व त्यांच्या मित्राने हा कट अतिशय नियोजनपूर्वक आखला होता. परंतु, पोलिसांची तत्परता आणि तंत्रज्ञानाची मदत यांमुळे त्याचा डाव फसला. अवघ्या १२ तासांच्या आत या न घडलेल्या दरोडय़ाचा कट उघडा पडला. या तपासात पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे, पोलीस हवालदार सचिन कदम, महेंद्र शिंदे, हवालदार समेळ, वडते, तर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील साहाय्यक पोलीस निरीक्षक कावळे, पोलीस हवालदार चिमटे, एस एस मोरे यांच्या पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याप्रकरणी माणगाव न्यायालयात सुनावणी सुरू आहे.