20 February 2019

News Flash

खारफुटी क्षेत्रात वाढ!

मुंबई उपनगरातील खारफुटी क्षेत्रात चांगली वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

कांदळवन कक्षातर्फे मंडाले येथे वृक्षारोपणाचे काम सुरू आहे.

मुंबईतील तिवरांच्या क्षेत्रात १६ चौरस किमींची वाढ; कांदळवन संरक्षण कक्षाची वृक्षारोपण मोहीम पथ्यावर

कांदळवन संरक्षण विभागाअंतर्गत राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण लागवडीमुळे २०१५-२०१७ या कालावधीत मुंबई परिक्षेत्रातील खारफुटीच्या क्षेत्रात तब्बल १६ चौरस किमीची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या वन सर्वेक्षण अहवालातून ही माहिती हाती येत असून यामध्ये मुंबई उपनगरातील खारफुटी क्षेत्रात चांगली वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

वन विभागाअंतर्गत कांदळवन कक्षाची स्वतंत्र स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या किनारी भागात खारफुटी वृक्षारोपणाची मोहीम विभागाने हाती घेतली आहे. याच अंतर्गत २०१२ पासून मुंबईतील भांडुप, कांजूरमार्ग, मंडाले, चारकोप आणि मनोरी येथील खाडीभागातील जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यापैकी भांडुप आणि कांजूरमार्ग येथील सुमारे ८० टक्के रोपांनी तग धरल्याचा दावा कांदळवन कक्षाने केला असून यंदाच्या वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात झाली आहे.

कांदळवन संरक्षण विभागाच्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगर मिळून ४ हजार हेक्टर जमिनीवर खारफुटीच्या जंगलाचे अस्तित्व आहे. त्यापैकी २७७ हेक्टर हे मुंबई शहरात आणि ३,७२३ हेक्टर हे मुंबई उपनगरात आहे. उपनगरापैकी बोरिवली परिक्षेत्रात १,३६५ हेक्टर, कुर्ला येथे २,२८८ हेक्टर आणि अंधेरी परिक्षेत्रात ७० हेक्टरवर खारफुटीचे अस्तित्व आहे. २०१५ सालच्या केंद्रीय वन अहवालानुसार मुंबईत ५० चौ.कि. क्षेत्रावर खारफुटी क्षेत्र अस्तित्वात होते. यंदा जाहीर झालेल्या अहवालानुसार  मुंबईत उपनगरातील खारफुटी क्षेत्रात १६ चौ.कि. क्षेत्राची भर पडली असून शहर भागातील २ चौ.कि. क्षेत्रात कोणत्याही प्रकारची वाढ न झाल्याचे निर्देशनास आले आहे. २०१२-१३ साली कांदळवन कक्षाकडून भांडुप आणि कांजूरमार्ग येथे खाडीलगत १० हेक्टर परिसरात खारफुटी लावण्यात आली होती. शिवाय मंडाले येथे २०१३-१५ या कालावधीत ८८,८८० तिवरांच्या रोपाची लागवड करण्यात होती. भांडुप, कांजूरमार्ग आणि मंडाले येथे लावण्यात आलेल्या रोपांची वाढ मध्यम घनतेच्या जंगलात झाली असून हा भाग मुंबई उपनगराच्या परिक्षेत्रात येत असल्यामुळे उपनगराच्या खारफुटी क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र शहरी भागात वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्या क्षेत्रात वाढ न झाल्याची माहिती कांदळवन कक्षाचे उप-वनसंरक्षक मकरंद घोडके यांनी दिली.

३० लाख तिवरांच्या लागवडीचा मानस

कांदळवन कक्षातर्फे २०२० पर्यंत महाराष्ट्राच्या किनारी भागात ५० लाख तिवरांच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत यंदा १९ लाख तिवारांच्या रोपांना महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात लावण्याचा कक्षाचा प्रयत्न असणार आहे, तर २०१९ मध्ये ३० लाख तिवरांच्या रोपांना लावण्याचा कक्षाचा मानस आहे. यंदाच्या वृक्षारोपणाच्या मोहिमेला मुंबईत सुरुवात झाली आहे. मंडाले आणि भांडुप या ठिकाणी खाडीक्षेत्राच्या भूखंडात वृक्षारोपणाचे काम करण्यात येत आहे. यासाठी कामगारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत या रोपांना लावण्याचे काम सुरू आहे.

खारफुटी क्षेत्राचे महत्त्व

वादळ आणि मोठय़ा सागरी लाटांची तीव्रता कमी करण्यात किनारीपट्टय़ामध्ये असणाऱ्या कांदळवनांची मदत होते. तसेच सागरी लाटा आणि वारे यांच्यापासून किनाऱ्याची धूप कमी करण्यासाठीदेखील कांदळवने महत्त्वाची भूमिका बजावतात. जमिनीवरून समुद्रात मिसळणारी प्रदूषके विशेषत: गाळ आणि जड धातू गाळून पाण्याची गुणवत्ता सुधारण्याचे काम खारफुटी करते. प्रामुख्याने किनाऱ्यालगत वाढणाऱ्या प्रवाळींच्या अस्तित्वाकरिता कांदळवन परिसंस्थेची नितांत आवश्यकता असते.

वृक्षारोपणाच्या कामाबरोबरच मुंबईभोवती पसरलेल्या खारफुटी क्षेत्राचे संरक्षण करणेदेखील महत्त्वाचे आहे. खारफुटींवर होणारे अतिक्रमण  लक्षात घेता येत्या काळात १०८ सुरक्षारक्षकांची नियुक्ती ही खारफुटी क्षेत्रावर पहारा ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे.

– एन. वासुदेवन, मुख्य वनसंरक्षक, कांदळवन संरक्षण विभाग

First Published on February 14, 2018 4:30 am

Web Title: mangrove area in mumbai increased by 16 sq km