आरोपींकडे कसून चौकशी; जबाब नोंदवण्यात अडचणी

वॉर्डन मंजुळा शेटय़ेच्या हत्येसाठी आरोपी महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना भायखळा कारागृहाबाहेरून कोणी प्रवृत्त केले का, त्यासाठी कोणी सहकार्य केले का? याचा तपास गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने सुरू केला आहे.

आतापर्यंत या पथकाने मंजुळा हत्येच्या साक्षीदार असलेल्या कारागृहातील कैदी महिलांपैकी आठ जणींचा जबाब नोंदवला. त्यातून दोन अंडी, पाच पावांवरून मंजुळाला मारहाण घडल्याची माहिती पुढे येते आहे. मात्र हेतू समोर आलेला नाही. त्यासाठी पथकाकडून जास्तीत जास्त महिला कैद्यांचे जबाब नोंदवण्याची धडपड सुरू आहे. यातून पुढे आलेली माहिती, आरोपींच्या चौकशीतून समोर आलेले तपशील जुळवून पाहिले जाणार आहेत.

मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार तीन महिन्यांच्या वास्तव्यात मंजुळा आणि कारागृह अधिकाऱ्यांचे विविध कारणांवरून खटके उडाले होते. हत्येच्या दोन दिवस आधी जेवणातील र्तीवरून वाद घडला होता. जेवण, नातेवाईकांच्या भेटीसाठी कैद्यांना मिळणारी संधी, अवधी, कारागृहात नेण्याची व्यवस्था आणि कारागृहातील ज्येष्ठता आणि त्यातून मिळणारे फायदे अशा वेगवेगळय़ा कारणांवरून मंजुळा, कैदी, कारागृह अधिकारी यांच्यात धुसफुस होती.

या हत्येला कारागृहातील कैदी साक्षीदार आहेत. तांत्रिकदृष्टय़ा त्या सर्व न्यायालयाच्या ताब्यात किंवा न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रत्येकीचा जबाब नोंदवणे सहज सोपे नाही. त्याआधी संबंधित न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असते. ही प्रक्रिया मोठी व वेळखाऊ असल्यानेच आतापर्यंत अवघ्या आठच जणींचे जबाब नोंदवणे शक्य झाले आहे. आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी पन्नास दिवसांचा अवधी आहे. मात्र ही प्रक्रिया पाहता सर्वाचेच जबाब नोंदवून, त्यातून पुढे आलेली माहिती जुळवून निष्कर्षांवर येणे, त्याआधारे आरोपपत्र तयार करणे आव्हान आहे. आरोपींचे भ्रमणध्वनी पुढील तपासासाठी हस्तगत करण्यात आले असून हेतूबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, मंजुळाला मारहाण घडली तेव्हा एका आरोपी महिलेने भ्रमणध्वनीमधून संपूर्ण घटना चित्रित केल्याची तसेच कारागृहातील काही कर्मचाऱ्यांनीही आपल्या भ्रमणध्वनीतही हे चित्रण केल्याची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात कारागृहात अधीक्षकाशिवाय अन्य कोणालाही भ्रमणध्वनी नेता येत नाही. त्यामुळे या माहितीत तथ्य नसल्याचे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

त्याचित्रीकरणात लैंगिक अत्याचार दिसले नाहीत..

न्यायवैद्यक प्रयोग शाळेने कारागृहातील दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेले चित्रीकरण गुन्हे शाखेला उपलब्ध करून दिले. त्यात आरोपी पोलीस महिला वॉर्डन मंजुळा शेटय़ेला मारहाण करताना दिसतात. मात्र त्यांच्याकडून मंजुळावर करण्यात आलेला लैंगिक अत्याचार दिसत नसल्याची माहितीही मिळाली आहे. गुन्हे शाखेने २३ आणि २४ जूनचे चित्रण तत्परतेने द्यावे, अशी विनंती प्रयोगशाळेकडे केली होती. त्यानुसार प्रयोगशाळेने या दोन दिवसांमधलेच चित्रण सुरुवातीला गुन्हे शाखेच्या हवाली केले. आता प्रयोगशाळेत अन्य कॅमेरे, आधीपासूनचे चित्रण मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातून मंजुळाला आधी कधी मारहाण घडली होती का हे स्पष्ट होणार आहे.