News Flash

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर काळाच्या पडद्याआड

अविनाश खर्शीकर यांनी राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं राहत्या घरी निधन झालं आहे. गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं असून त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाल्याचं पाहायला मिळालं.

अविनाश खर्शीकर यांनी ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी एकाहून एक सरस अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. यापैकी ‘जसा बाप तशी पोरं’, ‘आई थोर तुझे उपकार’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘लपवाछपवी’, ‘माफीचा साक्षीदार’ असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले.

विशेष म्हणजे केवळ रुपेरी पडदाच नव्हे तर रंगभूमीवरदेखील त्यांच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘वासूची सासू’, ‘अपराध मीच केला’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘लफडा सदन’ ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली.

दरम्यान, अविनाश खर्शीकर यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. ‘दामिनी’ या लोकप्रिय मालिकेत ते झळकले होते. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 1:06 pm

Web Title: marathi actor avinash kharshikar passed away ssj 93
Next Stories
1 Video: मुंबईचं राजभवन राहिलेल्या २५० वर्ष जुन्या इमारतीचा इतिहास
2 बोरिवलीत सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्रे
3 इमारतीतून बाहेर पडलेल्या रहिवाशावर गुन्हा
Just Now!
X