ई-रीटेल संकेतस्थळांवरून खरेदी करण्याची सवय असलेल्या तरुणाईला या संकेतस्थळांवर फारशी मराठी पुस्तके खरेदी करण्याची संधी मिळत नव्हती. आता ही संधी मिळणार असून अ‍ॅमेझॉन इंडियातर्फे संकेतस्थळावर मराठी पुस्तकाचे विश्व खुले केले जाणार आहे. या संकेतस्थळावर मराठीतील तब्बल साडेपाच हजारहून अधिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून ती घरपोच मिळणार आहेत.
पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, विश्वास पाटील, रणजित देसाई, कुसुमाग्रज, रत्नाकर मतकरी यांसारख्या ख्यातनाम साहित्यिकांच्या पुस्तकांसोबतच नवीन मराठी साहित्यही या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही येथे उपलब्ध होणार आहे.  amazon.in या संकेतस्थळावर यापूर्वी हिंदी, तामिळ, कन्नड भाषेच्या पुस्तकांसाठी वेगळा कक्ष सुरू करण्यात आला होता. यानंतर आत मराठीसाठी हा कक्ष सुरू केला जात असल्याचे अ‍ॅमेझॉन इंडियाचे श्रेणी व्यवस्थापन विभागाचे संचालक नूर पटेल यांनी स्पष्ट केले. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी १५ ते २१ डिसेंबर या कालावधीत काही ऑफर्सही देण्यात आल्या आहेत.
तसेच ही पुस्तके सवलतीमध्येही उपलब्ध करून दिली आहेत. संकेतस्थळावर पुस्तकांचे विभागवार वर्गीकरण करण्यात आल्यामुळे आपल्याला पाहिजे त्या विषयाची पुस्तके शोधण्यास मदत होते. यामुळे मराठी पुस्तकांची ऑनलाइन खरेदी आता अगदी सहज शक्य होणार आहे.