प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल निर्माते, वितरक साशंक

मुंबई : आठ महिन्यांनंतर चित्रपटगृहांची दारे उघडण्याचा निर्णय झाला आणि चित्रपटसृष्टीत आनंदाची लहर उठली. मराठीत अनेक चांगले चित्रपट प्रदर्शनाअभावी रखडले असले तरी जोवर प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही तोवर ते प्रदर्शित करणार नसल्याची भूमिका निर्माते-वितरकांनी घेतली आहे. मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी किमान डिसेंबर उजाडेल, असा अंदाज निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

सुभाष घई यांची निर्मिती असलेला ‘विजेता’ हा एकमेव मराठी चित्रपट १२ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. मराठीत ‘पांघरूण’, ‘अनन्या’, ‘दगडी चाळ २’, ‘दे धक्का २’, ‘मी वसंतराव’, ‘अमलताश’ यांसह ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘येरे येरे पावसा’, ‘ईमेल फीमेल’ असे अनेक चित्रपट तयार आहेत. सध्या चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेत चालवण्यात येणार आहेत. त्यातही करोनाची भीती अजून लोकांच्या मनातून गेलेली नसल्याने प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहापर्यंत येतील का, याबाबत आम्ही साशंक आहोत. त्यामुळे जिथे एवढे महिने वाट पाहिली तिथे आणखी काही दिवस वाट पाहून निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया ‘ईमेल फीमेल’ चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश जाधव यांनी व्यक्त केली.

विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळवणारा ‘येरे येरे पावसा’ हा चित्रपट प्रामुख्याने लहान मुलांचा चित्रपट आहे. त्यामुळे जोपर्यंत मुलांना घेऊन प्रेक्षक चित्रपटगृहात येणार नाही तोवर चित्रपट प्रदर्शनाची घाई करणार नसल्याचे दिग्दर्शिका शफाक खान यांनी स्पष्ट केले.

चित्रपटगृहांना तयारी करण्यासाठी आणि निर्मात्यांनाही नियोजनसाठी पुरेसा वेळ हवा आहे. त्यामुळे पुढच्या आठवडय़ात चित्रपटगृहे सुरू होतील, मात्र नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी किमान पुढचे पंधरा दिवस लागतील, अशी माहिती चित्रपट वितरक अंकित चंदरामाणी यांनी दिली. नाताळच्या मुहूर्तावर ‘बेभान’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. तोपर्यंत ‘चोरीचा मामला’, ‘हिरकणी’, ‘बॉईज’ असे काही आधी प्रदर्शित झालेले आणि चाललेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

म्हणणे काय?

’ ‘झी स्टुडिओज’चा ‘पांघरूण’ हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र आता त्याचे प्रदर्शन पुढे जाईल, असे ‘झी स्टुडिओज’चे मंगेश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. याबरोबर आणखी तीन चित्रपट आमच्याकडे तयार आहेत, पण त्यांची पुरेशी प्रसिद्धी व्हायला हवी. चित्रपटांच्या पूर्वप्रसिद्धीची गरज पहिल्यापेक्षा जास्त वाढली आहे.

’ त्यामुळे पूर्वप्रसिद्धीसह डिसेंबरपासून आम्ही हळूहळू हे तिन्ही चित्रपट प्रदर्शित करू. त्याआधी झीचाच ‘सूरज पे मंगल भारी’ हा हिंदी चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे, त्याला मिळणारा प्रतिसादही लक्षात घेऊन पुढचे नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

’ ‘व्हायकॉम १८’ कडेही ‘मी वसंतराव’, ‘अमलताश’ या दोन चित्रपटांसह अंकुश चौधरी आणि परेश मोकाशी यांचे चित्रपट तयार आहेत. पण प्रदर्शनासंदर्भात अजून काही जाहीर करण्यात आले नसल्याचे ‘व्हायकॉम १८’चे निखिल साने यांनी स्पष्ट केले.