बियर व मद्यनिर्मिती कारखान्यांबाबत खडसेंचा सावध पवित्रा

मराठवाडय़ात सातत्याने दुष्काळ पडत असल्याने नवीन साखर कारखाने काढण्यावर पुढील पाच वर्षे र्निबध लादण्याचा प्रस्ताव असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी सांगितले. मात्र नवीन बियर व मद्यनिर्मिती कारखान्यांनाही मनाई करणार का, असे विचारता सावध पवित्रा घेत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन आवश्यकता  वाटल्यास र्निबधांचा विचार करु, असे खडसे यांनी सांगितले.

मराठवाडय़ात गेली काही वर्षे दुष्काळी परिस्थिती असून ऊसासारखे भरपूर पाणी लागणारे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. साखर कारखान्यात गाळपासाठीही पाणी लागते. दुष्काळी परिस्थितीतही सुमारे १७ लाख मेट्रिक टन ऊसाचे उत्पादन असून गाळप मोठय़ा प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत एकाही साखर कारखान्याला  मराठवाडय़ात परवानगी द्यायची नाही, या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे, असे खडसे म्हणाले. दुष्काळी परिस्थितीमुळे पाच वर्षे नवीन बियर व मद्यनिर्मिती कारखान्यांवर बंदी घालणार का, असे विचारल्यावर खडसे यांनी सावध भूमिका घेतली. या कारखान्यांमुळे रोजगार मिळतो.  मात्र पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून गरजेनुसार निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.