राज्यातील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) शुक्रवारपासून राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय मार्डच्या डॉक्टरांनी घेतला आहे. या संपामुळे शासकीय रुग्णालयातील सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व नेत्ररोगचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख हे योग्यप्रकारे शिकवत नसून, शस्त्रक्रियाही करू देत नसल्याचा आरोप करत या दोघांचीही बदली करण्याची मागणी जेजेतील निवासी डॉक्टरांकडून करण्यात आली होती. यासंबंधी योग्य ती तपासणी करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून दिले गेल्यावरही तेथील निवासी डॉक्टरांनी मास बंक सुरू ठेवला होता. याच पार्श्वभूमीवर आता राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.