अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या संकटामुळे राज्यातील ग्रामीण भागातील असंख्य सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांच्या घरांवर गुढय़ाच चढल्या नसताना दुसरीकडे शहरांतील बाजारापेठांमध्ये मात्र खरेदीदारांच्या ‘शोभायात्रा’ मोठय़ा थाटामाटाने निघाल्याचे दिसत होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा या शुभमुहूर्तावर शनिवारी मुंबईसारख्या महानगरांतच नव्हे, तर सांगली, कोल्हापूर आणि नगर सारख्या छोट्या शहरांत खरेदीचा मोठा उत्साह होता. याला अपवाद ठरले ते पुणे आणि नागपूर शहर. तेथील बाजारपेठांमध्ये शनिवारी नरमाईचे चित्र होते. सांगलीत मात्र वाहन व सोने बाजारात कोटय़वधींची उलाढाल झाली. गारपिटीने फटका दिलेल्या नगर शहर आणि जिल्ह्य़ात तर सोने व वाहन खरेदीसाठी काही दुकानांत चक्क रांगा लागल्या होत्या.

मुंबई, ठाण्यात ग्राहकगर्दी

मुंबई- मुंबई शहर, उपनगरे, नवी मुंबई तसेच ठाणे, डोंबिवली परिसरातील दुकानांमधून शनिवारी ग्राहकांची मोठी गर्दी होती. ठाणे परिसरात एलबीटी व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या जास्त किंमती यामुळे खरेदीवर थोडा परिणाम झाला. दुकानात गर्दीचे दृश्य सगळीकडेच दिसत होते, पण प्रत्यक्ष खरेदीवर मात्र या दोन गोष्टींचा परिणाम झाला.

पुण्यात नरमाई

सोन्याचे भाव कमी असूनही अर्थसंकल्पातील काही तरतुदींमुळे खरेदीस फारशी गर्दी नव्हती कारण अशा प्रकारच्या सोने-चांदी खरेदीसाठी आता काही कागदपत्रे बंधनकारक करण्यात आली आहेत, त्यामुळे ग्राहक व सराफ व्यावसायिक यांचीही अडचण झाली आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी मार्चमध्ये केली जाते त्यात टीव्ही, फ्रीज व पंखे तसेच वातानुकूलन यंत्रणा यांचा समावेश असतो पण यंदा अवकाळी पावसामुळे नेहमीपेक्षा या वस्तूंना मागणी कमीच होती असे पुण्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे विक्रेते संदेश पटणी यांनी सांगितले. येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये ३७६ नव्या वाहनांची नोंदणी करण्यात आली.

सांगलीत कोटय़वधीची उलाढाल
सांगलीच्या सराफी पेठेत शनिवारी पाडव्याच्या मुहुर्तावर सोने खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत लोकांची गर्दी होती. दुकानांत सुवर्णालंकारापेक्षा सोन्याचे वेढण म्हणजेच चोख सोने खरेदीकडे ग्राहकांचा ओढा जास्त असल्याचे गाडगीळ सराफी पेढीतून सांगण्यात आले. तसेच शहरात दुचाकी खरेदीतही मोठय़ा प्रमाणात उलाढाल झाली.

कोल्हापुरात खरेदीसाठी गर्दी
कोल्हापूर येथे यंदा बाजारपेठेत विविध कंपन्यानी आणलेल्या इलेक्टॉनिक्स वस्तूंचीही  मोठया प्रमाणात नागरीकांनी खरेदी केली. वाढत्या कडक उन्हामुळे नागरिकांचा फ्रिज, एसी, कुलर आदी खरेदीकडे अधिक ओढा असल्याचे दिसून येत होते. दिवसभरात शहर व परिसरात कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.