साठेबाजीला आळा बसून भाववाढ टळावी यासाठी कांद्याला बाजार समिती कायद्यातून मुक्त करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यभरातील व्यापारी बिथरले असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई यासारख्या परिसराला कांदा पुरविणारे वाशी बाजारातील घाऊक व्यापारी या निर्णयाविरोधात पुढील आठवडय़ापासून संपाचे हत्यार उगारणार आहेत. या आंदोलनाची दिशा शुक्रवारी ठरणार आहे. या आंदोलनामुळे मुंबईकरांपुढील कांद्याच्या भाववाढीचे संकट अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता वाशी येथील कांदा-बटाट बाजारात व्यापारी आणि माथाडी कामगारांची बैठक होणार आहे, अशी माहिती या बाजाराचे संचालक अशोक वाळुंज यांनी लोकसत्ताला दिली. शेतातला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची भाषा सरकार करीत असले तरी आमच्या मदतीशिवाय हे त्यांनी शक्य करून दाखवावेच, असे आव्हान वाशी बाजारातील व्यापाऱ्यांच्या एका मोठय़ा गटाने गुरुवारी दिले. बुधवारपासून आम्ही कांद्याच्या घाऊक बाजाराला टाळे ठोकतो. मग शेतातला कांदा घराघरात पोहोचवून दाखवा, असा खोचक इशारा या व्यापाऱ्यांनी दिला.
कांदा मुबलक असूनही केवळ साठेबाजीमुळे भाव वधारल्याचा जावईशोध केंद्र सरकारने लावला आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शेतातला कांदा थेट ग्राहकांपर्यत पोहचावा, अशी सरकारची इच्छा असली तरी त्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा सरकारने इतक्या वर्षांत उभीच केलेली नाही. त्यामुळे शेतातला कांदा नेमका कुणापर्यंत न्यायचा याची कल्पना शेतक ऱ्यांना नाही, असा दावा कांदा-बटाट आडत व्यापारी महासंघाचे पदाधिकारी चंद्रकांत रामाणे यांनी केला. सध्याच्या परिस्थितीत संप योग्य वाटत नसला तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील कांद्याची आवक पूर्णपणे बाजार समितीमधील घाऊक बाजारावर अवलंबून आहे, याचे भान सरकारने राखायला हवे, असेही ते म्हणाले. यंदा उन्हाळी कांद्याचे पीक रोडवल्यामुळे कांद्याची आवक घटत असून पावसाने ओढ घेतल्याने नवे पीक घेण्यात उशीर होत आहे, असा दावा गोपीनाथ मालुसरे या घाऊक व्यापाऱ्याने केला. कांद्याचे निर्यातशुल्क वाढवूनही मुंबई बाजारात आवक वाढली नाही, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे, असेही मालुसरे यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये विरोधाचा तीव्र सूर

*कांद्याला बाजार समिती नियमनातून वगळून जीवनावश्यक वस्तुंच्या यादीत समाविष्ट करण्यास नाशिक जिल्ह्य़ात उत्पादक, बाजार समिती, व्यापारी आणि
माथाडी कामगारांकडून तीव्र विरोध होत आहे.
*केंद्राकडून कोणताही लेखी अध्यादेश न आल्यामुळे गुरुवारी नेहमीप्रमाणे बाजार समितीत लिलाव झाले. या दिवशी कांदा भावात प्रति क्विंटलला १५० रुपयांनी घसरण होऊन ते सरासरी १८७५ रुपयांवर स्थिरावले.

*केंद्राच्या निर्णयामुळे देशांतर्गत वितरण व विक्री व्यवस्था कोलमडून पडेल. शिवाय, देशांतर्गत भाव अधिकच भडकतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.