मित्र ते विवाह हा प्रवास समाज माध्यमांमधून झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. सर्वानाच हाताच्या बोटावर नाचवणारे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ सध्या आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. तेथे सकाळी उठून वाचाळ गप्पा मारण्यापेक्षा काही उपयुक्त गोष्टींवर चर्चा करण्याकडे तरुणांचा कल सध्या वाढत आहे. तरुणाईची हीच आवड लक्षात घेऊन ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या कार्यकर्त्यांनी विवाहाची गाठ विवेकनिष्ठ पद्धतीने बांधण्याचा एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला अन् त्याचे फलितही लवकरच पाहायला मिळणार आहे.
सध्याच्या तरुण मुला-मुलींचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून त्यांना ‘कांदेपोहे’पेक्षा ‘कॉफी आणि बरंच काही..’ या पद्धतीने आपला जोडीदार निवडण्याची इच्छा आहे. ते विचारांनी विवाह करू पाहात आहेत. यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या कार्यकर्त्यां आरती नाईक यांनी ही कल्पना वास्तवात आणली. नाईक यांनी आपल्या ओळखीच्या काही तरुणांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप १३ डिसेंबरला सुरू केला. सुरुवातीला स्वत:बद्दल माहिती पुरविणे यासारख्या प्रयत्नांनंतर ग्रुपच्या सदस्यांसाठी नियमावली तयार करण्यात आली, त्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा आयोजित केली. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या विचारांची दिशा लक्षात येत होती. यामध्ये विचारलेले प्रश्न हे सहजीवनाशी संबंधित होते. याचबरोबर लैंगिकतेपासून अगदी घरातील कामांपर्यंतचे विविध प्रसंग देऊन त्यावरून त्याप्रसंगी तुम्ही काय कराल यावर चर्चा घडवून आणली. यामुळे ग्रुपमधील इतर सदस्यांना आपल्याला विचारांशी जुळवून घेणारा जोडीदार निवडणे सोपे झाले असल्याचे आरती यांनी सांगितले.
गेले दोन महिने ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यावर सहजीवनाच्या संदर्भात रोज एक विषय दिल्यावर मुलांमुलींमध्ये सकस चर्चा होत होती. यामधील सदस्य एकमेकांना ओळखत नसले तरी सहजीवनाच्या संदर्भात दिलेल्या विषयावर आपले मत व्यक्त करीत असताना त्यांच्या विचारांशी एकमेकांना ओळख होत गेली. यातून वैचारिक मैत्रीला सुरुवात झाली. सुरुवातीला आंतरजातीय व धर्मीय विवाहास नकार देणाऱ्यांचे दोन महिन्यांनंतर मतपरिवर्तन झाले. दोन महिन्यांनंतरच्या ऑफलाइन भेटीमध्ये औरंगाबाद, पुण्याहूनही मुली सहभागी झाल्या होत्या. या कार्यशाळेत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पाटकरांनी ‘विवेकाचा अविवेक’ या विषयावर मांडणी केली. आपण जरी विवेकी विचार करतो असे म्हणत असलो तरी वागताना आपण बऱ्याच अविवेकी निर्णय घेतो. स्त्री-पुरुष समानता म्हणताना वास्तवात आपण स्त्रियांना समान वागणूक देत नसल्याचे पाटकरांनी सांगितले. दोन महिन्यांच्या चर्चेनंतर योजलेल्या या कार्यशाळेत वेगवेगळ्या सत्रांच्या माध्यमातून मुले-मुली व्यक्त होत होत्या.
सध्या आपल्या आसपास वेगवेगळ्या जातीधर्माची वधू-वर सूचक मंडळे काम करीत आहेत. पण यामुळे जातीजातीमधील अंतर कमी होण्यापेक्षा वाढत आहे. या उपक्रमात जाती-धर्म, उत्पन्न याहीपेक्षा विचारांना महत्त्व देऊन त्यावर जोडीदार शोधण्याची संधी लग्नाळू सदस्यांना मिळाली. यानंतर मे महिन्यात या मुलांच्या पालकांची कार्यशाळा घेतली जाईल. लग्न या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांचा अंतर्भाव करण्याची गरज आरती यांनी व्यक्त केली आहे.

या ग्रुपच्या माध्यमातून कित्येक लग्नाळू मुले-मुली आमच्याशी जोडल्या गेल्या. दोन महिन्यांच्या चर्चानंतर अनेक मुले-मुली लग्नासाठी तयारही झाले आहेत. ही मुले स्वत:चे लग्नाचे नियोजन स्वत: करीत आहेत. मात्र या चर्चामध्ये मुली या आपले विचार मांडण्यात, स्वत:चे निर्णय घेण्यात सरस ठरत असल्याचे अनेक मुलांनी प्राजंळपणे कबूलही केले.
आरती नाईक

या ग्रुपमधील चर्चामधून मला माझ्या विचारांशी जुळणाऱ्या मुलांची ओळख झाली. हा उपक्रम खूपच वेगळा असून नक्कीच यामधील माझ्या विचारांशी जुळलेल्या व्यक्तीसोबत विवाह करावयाची इच्छा आहे. परंपरेला धरून योग्य मार्ग कसा काढता येईल याची प्रचीती या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून आली.
दीक्षा काळे, औरंगाबाद</strong>