दुसरे सत्र

महाराष्ट्रात ठिकठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग सुरू असून आधुनिक शेतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मितीचे सामर्थ्य आहे, असे आग्रही प्रतिपादन कृषी व जलतज्ज्ञ सुधीर भोंगळे यांनी केले.

बदलता महाराष्ट्रच्या कृषी उद्योगावरील चर्चासत्रात ‘प्रयोगशील शेती’ या परिसंवादात सुधीर भोंगळे बोलत होते. प्रयोगशील शेतकरी अरुण देशपांडे, वेंकट अय्यर यांनी यात सहभाग घेतला. ऊस, संत्री, मोसंबी, द्राक्ष, सीताफळ आदींच्या उत्पादनांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रयोग सुरू आहेत. बंदिस्त वातावरणात आंबा, द्राक्षाचे उत्पादन घेण्यात येत आहे. मात्र हे प्रयोग करताना रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करण्याबाबत जागरूकता येत आहे. कारण जागतिक बाजारपेठेत खतांचा अतिवापर असलेल्या शेतमालाला ग्राहक मिळत नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी प्रयोगाची कास धरली आहे. मात्र आपण  केलेल्या प्रयोगाची माहिती शेतकरी मनमोकळेपणाने देत नाहीत, अशी खंत सुधीर भोंगळे यांनी व्यक्त केली. शेतीसाठी केलेला प्रयोग आणि तो करताना आलेला अनुभव याचे शेतकऱ्यांनी परस्परांमध्ये आदानप्रदान करायला हवे, असे आवाहनही सुधीर भोंगळे यांनी केले.

तर कृषी उत्पादनात वाढ व्हावी या लालसेपोटी मोठय़ा प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर करण्यात येतो आणि त्यामुळे आरोग्य आणि जमिनीचा पोत बिघडतो. शेतीसाठी तब्बल २२ ते २३ प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्याचे दुष्परिणाम आपल्याला दुर्धर आजारांच्या रूपात भोगावे लागतात. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीन खारट व नापीक बनते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळायला हवे, असे आवाहन वेंकट अय्यर यांनी केले. तसेच सुरुवातीला हा बदल करताना उत्पादन थोडे कमी होईल. पण दोन-तीन वर्षांत जमिनीचा पोत पूर्ववत होऊन चांगले उत्पादन मिळते. शिवाय रासायनिक शेतीपेक्षा उत्पादन खर्च कमी येत असल्याने फायदा जास्त होतो. आता तर सेंद्रिय उत्पादनांना जास्त दर मिळत आहे, असे सांगत वेंकट अय्यर यांनी आपले अनुभव सांगितले.

रोजगाराच्या निमित्ताने शहरांमध्ये डेरेदाखल झालेल्या तरुणांनी महात्मा गांधीजींनी दिलेला कानमंत्र जपत पुन्हा गावची वाट धरायला हवी.

केवळ उपजीविकेसाठी शहरात स्थलांतरित झालेल्या लोकांना अत्यंत ताणतणावात आणि अनेकदा निकृष्ट वातावरणात राहावे लागते. अशा लोकांना पुन्हा गावाकडे शेतीवर आधारित चांगले जीवन जगता येऊ शकते, असे प्रतिपादन अरुण देशपांडे यांनी केले. तसेच आपण पेट्रोलियम पदार्थाचा व ऊर्जेचा अतिरेकी वापर करणारी जीवनशैली स्वीकारत असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली.

या परिसंवादाचे सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’चे स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ यांनी केले.

प्रयोगशील शेती या विषयावरील परिसंवादात सेंद्रिय शेतीच्या यशस्वी प्रयोगांचे अनुभव कथन करताना वेंकट अय्यर. शेजारी कृषीतज्ज्ञ सुधीर भोंगळे व प्रयोगशील शेतकरी अरुण देशपांडे.