29 September 2020

News Flash

काही पोलीस ठाणी रडारवर; पोलिसांच्या बदल्यांचीही शक्यता

पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी आता केबीनमध्ये न बसता पोलीस ठाण्यांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे.

पोलीस ठाण्यातील कथित खंडणीखोरीची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. काही पोलीस ठाणी खास रडारवर असून सार्वत्रिक बदल्यांमध्ये संबधित खंडणीखोर अधिकाऱ्यांना सार्वत्रिक बदल्यांच्या निमित्ताने चाप लावण्यात येणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. अशा अधिकाऱ्यांची एक यादीच तयार करण्यात येणार आहे. अशा अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी यासाठी आयुक्तही आग्रही असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी आता केबीनमध्ये न बसता पोलीस ठाण्यांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. या भेटीत ते तक्रारदारांच्या व्यथा जाणून घेत आहेत. याशिवाय पोलिसांविरुद्ध असलेल्या तक्रारीही ऐकत आहेत. काही पोलीस ठाण्यात उघडपणे खंडणीखोरी सुरू असल्याच्या तक्रारीही त्यांच्या कानावर गेल्या आहेत. याचे पडसाद पोलिसांच्या येत्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. उपनगरातील काही मोक्याच्या पोलीस ठाण्यात असे प्रकार मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. मलईदार नियुक्तीसाठी हे पोलीस ठाणे प्रसिद्ध आहे.

क्षुल्लक बाबींमध्ये गुन्हा नोंदविण्याची धमकी देणे वा अदखलपात्र गुन्ह्य़ात एकाविरुद्ध गुन्हा नोंदविणे आणि दुसऱ्या पक्षकाराला मोकळीक देणे आदी प्रकार सर्रास सुरू आहेत. या प्रकरणी आयुक्त संतापले असून त्यांच्याकडून कारवाई केली जाणार आहे. अशा काही पोलीस ठाणी आयुक्तांच्या रडारवर असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी उपायुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपायुक्तांनी त्यांच्या कार्यालयात न राहता प्रत्यक्ष पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या पाहिजेत, असे फर्मानही आयुक्तांनी काढले आहेत.

उपायुक्त पातळीवर बैठका घेऊनही तशा सूचना आयुक्तांकडून दिल्या जात आहे. परिसरातील वाहतूक कोंडीकडे होत असलेले दुर्लक्ष हाही प्रमुख मुद्दा आयुक्तांच्या यादीवर आहे.

पोलीस ठाण्यातील खंडणीखोरीची तक्रार आपल्यापर्यंत आली तर कोणाचीही गय केली जाणार नाही. पोलिसांनी नागरिकांशी सौजन्यानेच वागले पाहिजे. महिला तसेच वयोवृद्ध तक्रारदारांच्या तक्रारींची तात्काळ नोंद केली पाहिजे. त्यात कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही

– दत्तात्रय पडसलगीकर, पोलीस आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 2:12 am

Web Title: may police transfers in different police station
Next Stories
1 घनकचरा व्यवस्थापनाला सहाय्यक आयुक्त मिळणार
2 उत्तम करिअरसाठी ‘मार्ग यशाचा’
3 फॅशनबाजार : मनगटावरची सुबक, देखणी टिकटिक..
Just Now!
X