काही खासगी रुग्णालये लक्झरी सेवा देणाऱ्या हॉटेल्ससोबत भागीदारी करून लसीकरण पॅकेज देत असल्याच्या मुद्द्यावर केंद्राने संताप व्यक्त केलेला असतानाच मुंबईतही असाच प्रकार सुरू असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांना मिळाली. महापौर पेडणेकर यांनी लागलीच द ललित या पंचतारांकित हॉटेलला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या लसीकरणाची माहिती घेतली. काही गोष्टी नियम नीटपणे होत नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार असल्याची माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली.

काही खासगी रुग्णालये हॉटेल्ससोबत हातमिळवणी करून तसेच काही हॉटेल्सकडून कोविड लसीकरण पॅकेज दिलं जात असून यामध्ये राहण्याची सुविधा, ब्रेकफास्ट, डिनर, वायफाय याशिवाय विनंतीनुसार तज्ञ डॉक्टरांकडून लसीकरण अशी ऑफर दिली जात आहे. यावर केंद्राने राज्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या असून, अशाच प्रकारे मुंबईतील द ललित या पंचतारांकित हॉटेलमध्ये लसीकरण सुरू असल्याची माहिती महापौर पेडणेकर यांना मिळाली.

त्यांनी लागलीच हॉटेलला अचानक भेट देऊन सुरू असलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. ‘द ललित’ या हॉटेलात देखील ३,५०० रुपयांच्या पॅकेजमध्ये लस दिली जात असल्याची चर्चा होती. महापौरांनी याचीही माहिती घेतली. या हॉटेलमध्ये दिवसाला ५०० लोकांना लस देण्यात आल्याची बाब समोर आली. मूळात या हॉटेलमध्ये लशींच्या सुरक्षिततेसाठी निश्चित करण्यात आलेली कोल्ड चेन मेन्टेन केली जात नसल्याचं उघड झालं आहे.

कोविड लशींचा साठा करण्यासाठी घरगुती फ्रीजचा वापर केला जात असल्याचं यावेळी महापौरांच्या निदर्शनास आलं. तसेच आइस बॅग म्हणून पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात होता. त्यामुळे महापौरांनी ‘द ललित’मध्ये होत असलेल्या लसीकरणाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकाराबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकांनाही जाब विचारला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.