मुंबई : शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी महापौर बंगला रिकामा केला आणि प्रशासनाने उपलब्ध केलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यात मुक्कामासाठी दाखल झाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये त्यांचे स्मारक उभारावे अशी  मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत होती. त्यानंतर मुंबईमधील अन्य काही ठिकाणांचा विचार करण्यात आला. अखेर शिवाजी पार्क मैदानापासून जवळ समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या महापौर बंगल्याच्या जागेची स्मारकासाठी निवड करण्यात आली. त्यानंतर महापौरांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला.

पालिका प्रशासनाने सुरुवातीपासूनच अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड वास्तव्यास असलेल्या राणीच्या बागेतील उद्यान अधीक्षकांचा बंगला महापौरांना उपलब्ध करण्याची भूमिका घेतली होती. मात्र या बंगल्याला शिवसेनेकडून कडाडून विरोध करण्यात आला. मलबार हिल येथील जलअभियंत्यांचा बंगला महापौरांना वास्तव्यासाठी द्यावा, अशीही मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती.    शिवसेना विरुद्ध प्रशासन असा वाद काही काळ सुरू होता. त्याच वेळी प्रशासन पदाला साजेसा बंगला देत नसेल तर आपण आपल्या मूळ घरी वास्तव्यास जाऊ, असा इशारा महाडेश्वर यांनी दिला होता.

तर भाजपने महालक्ष्मी येथे महापौरांसाठी नवा बंगला बांधून देण्याची मागणी केली होती. प्रशासनाने निवडक भूखंडाची यादी महापौरांना पाठवून तेथे महापौर बंगला बांधण्याची तयारीही दर्शविली होती. अखेर ‘मातोश्री’ने आदेश देताच विश्वनाथ महाडेश्वर यांनी राणीच्या बागेतील बंगल्यात जाण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे आबासाहेब जऱ्हाड यांनी हा बंगला रिकामा केला आणि त्यानंतर बंगल्याची रंगरंगोटी करण्यात आली.