लैंगिक गैरवर्तणूकप्रकरणी कायदेतज्ज्ञांचे मत

मी टू चळवळीमुळे अनेक वर्षांनंतर उघडकीस आलेली लैंगिक गैरवर्तणुकीची प्रकरणे न्यायालयात टिकाव धरू शकणार नाहीत, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. कायदा पुरावा मागतो. शिवाय अन्याय झाला हे सिद्ध करण्याची जबाबदारीही संबंधित महिलेवरच येते. त्यामुळे विलंबाने दाद मागणे म्हणजे न्याय मिळण्यापासून वंचित राहण्यासारखेच आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लैंगिक गैरवर्तणुकीच्या प्रकरणांमध्ये न्याय मागण्यास उशीर केलेला आहे. त्यामुळे न्याय मिळण्याची शक्यताही धूसर आहे, असे मत अ‍ॅड्. क्रांती साठे यांनी व्यक्त केले. गुन्हा घडल्यानंतर तो दाखल करण्यासाठी कायद्याने वेळ मर्यादा घालून दिली आहे. तसेच पुराव्यांच्या आधारेच न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागतो, असेही अ‍ॅड्. साठे यांनी स्पष्ट केले. शिवाय अशी प्रकरणे विलंबाने दाखल केली, तर अन्याय झाल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी तक्रारदार महिलेवर येते. त्यामुळे महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा उशिराने दाखल करण्यात आला, तरी खटल्याच्या वेळी पोलिसांची भूमिका तीच राहील वा असे खटले टिकू शकतील असे नाही, असेही साठे  म्हणाल्या.

खटला नैतिकतेवर नाही, तर पुराव्यांवर चालतो, असे मत अ‍ॅड्. रोहिणी सालियान यांनी व्यक्त केले. महिलांनी अत्याचारांना लगेच वाचा फोडायला हवी. सहकारी, कंपनी, पोलीस यांनी सहकार्य केले नाही तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी, असे सालियान यांनी सांगितले.

विलंबाने दाखल केलेले गुन्हे कसे सिद्ध करणार, पुरावे कुठून आणणार? असे प्रश्न आहेत. दाद मागण्यासाठी एवढा विलंब का हाही स्वतंत्र प्रश्न आहे, असे मत अ‍ॅड्. अशोक मुंदरगी यांनी मांडले.

मी टू या मोहिमेमुळे पुरुषी वृत्तीला वचक बसू शकेल. कामाच्या ठिकाणची परिस्थिती बदलण्यास मदत होईल. महिलांनी अशा मोहिमांची वाट पाहत बसण्याऐवजी अत्याचाराविरुद्ध वेळीच तक्रार करावी. दाद मागण्यासाठी महिला अन्य कायदेशीर पर्यायांचा अवलंब करू शकतात.    – अ‍ॅड्. क्रांती साठे

‘मी टू’या मोहिमेनिमित्ताने महिला अत्याचाराबाबत बोलत्या झाल्या हे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी असे उघडपणे बोलते होणे गरजेचेच होते. निदान यापुढे महिला कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांबाबत गप्प तरी राहणार नाहीत.  – अ‍ॅड्. रोहिणी सालियान

नाना पाटेकर यांच्यासह चौघांची नार्को चाचणी करा!

अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह चार आरोपींना तातडीने अटक करून त्यांची लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग आणि नार्को अ‍ॅनालिसिस चाचण्या करा, अशी मागणी शनिवारी तनुश्री दत्ता हिने ओशिवरा पोलिसांकडे केली.

तनुश्रीच्या आरोपांनुसार पाटेकर यांच्यासह नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, चित्रपट दिग्दर्शक राकेश सारंग, चित्रपट निर्माते समी सिद्दिकी यांच्याविरोधात ओशिवरा पेालिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. प्रत्येक आरोपी  प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. आरोपींचे राजकीय पक्षांशी संबंध आहेत. त्यामुळे ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. तसेच बनावट साक्षीदार उभे करू शकतात. त्यामुळे त्यांना तातडीने अटक करणे आवश्यक आहे, असे तनुश्रीने पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे.

गुन्हा नोंदविण्याच्या प्रक्रियेदरम्यान आरोपींनी माध्यमांसमोर आरोप धुडकावून लावले आहेत. पोलीस चौकशीतही ते हीच भूमिका घेतील. त्यामुळे पारदर्शक तपासासाठी आरोपींकडून नेमकी माहिती पोलिसांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्या नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचण्या कराव्यात, अशी मागणी तनुश्रीने केली आहे.

दहा वर्षांपूर्वी घडलेला हा गुन्हा असल्याने तेव्हा तेथे कोण उपस्थित होते, हा प्रसंग कोणी पाहिला याबाबत ओशिवरा पोलीस माहिती घेत आहेत. दरम्यान, आतापर्यंत एकाही व्यक्तीचा जबाब नोंदवलेला नाही, अशी माहिती ‘परिमंडळ -९’चे उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

अलोकनाथ पत्नीसह दंडाधिकारी न्यायालयात

लेखिका-दिग्दर्शिका विनता नंदा यांनी अभिनेते अलोकनाथ यांच्यावर नाव टाळून केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर ते आणि त्यांची पत्नी आशू यांनी शनिवारी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. नंदा यांच्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे पोलिसांना आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

‘मी टू’ मोहिमेत सहभागी होत नंदा यांनी समाजमाध्यमांवर अलोकनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी १९ वर्षांपूर्वी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर अलोकनाथ यांनी अ‍ॅड. अशोक सरोगी यांच्यामार्फत पत्रकार परिषद घेऊन नंदा यांच्या आरोपांचे खंडन केले होते.

नंदा यांच्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा अर्ज आपण अंबोली पोलिसांना दिला आहे. त्याची दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी विनंती नाथ आणि त्यांच्या पत्नीने न्यायालयाकडे केली. नंदा यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांनी आपल्याला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. तो कधीही पैशांनी भरून काढता येणार नाही. नंदा यांनी आरोप करताना आपल्या नावाचा उल्लेख केला नसला तरी अन्य लोकांनी आपल्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे समाजात आपली बदनामी झाली आहे.

‘मी टू’ मोहिमेचा आधार प्रत्येकजण प्रसिद्धी वा अन्य कारणांसाठी घेत असून कुणाची तरी बदनामी करत आहेत, असा आरोपही अलोकनाथ आणि त्यांच्या पत्नीने तक्रारीत केला आहे. नंदा यांच्या आरोपामुळे आपल्याला घराबाहेर पडण्यासही भीती वाटत असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.