माशांच्या दरांनी तोंड पोळले की चोखंदळ ग्राहक चिकन-मटनाकडे वळतात. परंतु मटनाचे भावही तब्बल दहा टक्क्य़ाने वधारणार असल्याने मांसाहारींना आता ‘उपवासा’च्या दिवसात वाढ करावी लागणार आहे.
देवनार पशुवधगृहातून मुंबईच्या विविध भागांत जाणाऱ्या जिवंत बैल, शेळ्या-मेंढय़ा आणि डुकरांवरील शुल्कामध्ये १ एप्रिलपासून १० टक्कांनी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे मटणाच्या दरात पुढील महिन्यापासून वाढ होणार असून, चोखंदळ मांसाहारींना अधिक पैसे मोजून आपल्या जिभेचे चोचले पुरवावे लागणार आहेत. सध्या मटनाचे दर सुमारे ४०० ते ४५० रुपये किलो, तर मासे अंदाजे ५०० ते १००० रुपये किलो दराने आहेत.
राज्याच्या विविध भागातून देवनार पशुवधगृहात बैल, शेळ्या-मेंढय़ा, डुक्कर विक्रीसाठी आणले जातात. अनेक व्यापारी, खाटिक देवनार पशुवधगृहातून या जिवंत प्राण्यांची खरेदी करतात आणि विविध भागांमध्ये त्यांची विक्री करतात. पशुवधगृहातील जिवंत प्राणी बाहेर घेऊन जाण्यासाठी पालिकेकडून त्यावर शुल्क आकारणी केली जाते. सध्या प्रति बैलासाठी ४८४ रुपये, एक शेळी अथवा मेंढीसाठी ४९ रुपये, तर डुकरासाठी ६१ रुपये शुल्क घेतले जाते. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये या शुल्कात १० टक्कांनी वाढ केली जाते. त्यानुसार येत्या १ एप्रिलपासून जिवंत बैलाची पशुवधगृहाबाहेर पाठवणी करण्यासाठी जादा ५३.३३ शुल्क म्हणजे खरेदीदाराला ५३३ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच शेळी अथवा मेंढी आणि डुकरासाठी अनुक्रमे ५९ रुपये ४० पैसे व ७४ रुपये ८० पैसे शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कामध्ये वाढ झाल्याने मटणाच्या दरातही वाढ होणार आहे. तसेच हॉटलमधील मटणाच्या दरातही वाढ होणार आहे.