राज्यात भाजपला वगळून सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला मदत करण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकारघंटा वाजवली गेली असतानाच शिवसेनेच्या आमदारांची उद्या बैठक बोलाविण्यात आली आहे.

या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असल्याने या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून नव्याने प्रस्ताव पाठविण्यात आले असले तरी ठाकरे यांनी अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

सत्तास्थापनेला शिवसेनेमुळेच विलंब होत असल्याची भूमिका घेत भाजपने मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर बुधवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसह सरकार स्थापन करण्याबाबत प्रतिकूल भूमिका मांडत विरोधात बसणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर अवकाळी पावसाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची बैठक बोलावली होती.  शिवसेनेच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी बैठकीला हजेरी लावल्याने भाजपच्या गोटात सुटकेचा नि:श्वास टाकण्यात आला. शिवसेनेच्या मंत्र्यांना भाजपबरोबर युती आणि सत्तेतील भागीदारी हवी आहे. आमच्या पुढे सर्व पर्याय खुले आहेत, आम्ही फार पुढे गेलो आहोत ही शिवसेनेची भूमिका आता हळूहळू निवळत असून  शिवसेना अधिकृत चर्चेला तयार होईल, असे संकेत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांची बैठक गुरुवारी सकाळी बोलावली आहे. त्यात पुढील वाटचालीची दिशा उद्धव ठाकरे स्पष्ट करतील, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री पद वाटून घेण्याबाबत ठरलेच नसल्याचे सांगत एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न भाजपने केला हे शिवसेनेच्या रागाचे एक मुख्य कारण आहे. त्याबाबत भाजपने महाराष्ट्रासमोर चित्र स्पष्ट केले पाहिजे, अशी शिवसेनेची अट आहे. भाजपने त्याबाबत तयारी दर्शवली असून ते कसे करायचे हे चर्चेतून ठरवू असे भाजप नेत्यांनी शिवसेना नेत्यांजवळ स्पष्ट केले आहे.