राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती आणि नातेवाईक माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील, कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक, सोलापुरातील काँग्रेसचे आमदार आणि एक विद्यमान खासदार या १ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांनीही आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचे जाहीर केल्याने भाजपची पुन्हा महाभरती जोमात सुरू झाली आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा सोलापुरात होणार आहे. राष्ट्रवादीचेच आणखी एक नेते भास्कर जाधव आणि आमदार अवधूत तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती आणि नातेवाईक माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आणि राज्याचे माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी अखेर भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्टला उस्मानाबादवासींसह ते संवाद साधणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उस्मानाबादची जागा लढवली होती. त्यात शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. ती त्यांनी फेटाळली होती. नंतर मात्र हळूहळू त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर राखण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या यात्रेला गैरहजर राहिल्यानंतर त्यांचा निर्णय स्पष्ट झाला होता.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी पाटील यांनी आपल्या मतदारांसाठी समाजमाध्यमांवर संदेश प्रसारित केला. ‘बदलत्या राजकीय परिस्थितीत जिल्ह्य़ासाठी जिव्हाळ्याचा असलेला कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प, कौडगाव औद्योगिक वसाहतीमधील उद्योग उभारणीसाठी काही निर्णय घेणे अपेक्षित आहे,’ असे सांगत त्यांनी ३१ ऑगस्टला सभेला येण्याचे आवाहन केले आहे.

उस्मानाबादचे भाजप नेते आणि प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पाटील हे भाजप प्रवेश करणार असल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे.

जगजितसिंह पाटील यांच्याबरोबरच कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सोलापुरातील काँग्रेसचे आमदार व एक विद्यमान खासदारही १ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे, असेही एका भाजप नेत्याने सांगितले. धनंजय महाडिक यांनी भाजप प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यामागील भूमिका लवकरच पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राणेंचा पक्ष भाजपत विलीन होणार

भाजपच्या सहकार्याने राज्यसभेवर निवडून गेलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत. एक सप्टेंबरला सोलापुरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत हे विलीनीकरण होईल, असे सांगण्यात आले.