आरे प्रकरणी मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोटी माहिती देत असून दिशाभूल करत आहेत असा गंभीर आरोप युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती देत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरेंची जनआशिर्वाद यात्रा अंबरनाथमध्ये पोहोचली असून यावेळी आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरही भाष्य केलं. नाणारबाबात स्थानिकांच्या भूमिकेला आमचं समर्थन असेल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प आणण्याबाबत सरकार फेरविचार करत असल्याचं सांगितलं आहे. “नाणार प्रकल्पामुळे एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे हा प्रकल्प आणण्याचा फेरविचार आम्ही करतो आहोत,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी आरेमध्ये मेट्रोचं कारशेड उभारण्याच्या निर्णयाला उघडपणे विरोध केला असून आपला विरोध दर्शवला आहे. आपला विरोध मेट्रोला नसून कारशेडला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी आरेमध्ये फक्त झाडांचा प्रश्न नसून बिबट्या, अजगर तसंच इतर दुर्मिळ प्राणीसंपदा असून त्यांचंही मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. वरळीतून निवडणूक लढण्यासंबंधी बोलताना हा निर्णय मी नाही तर जनता घेईल असं सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केलं.