सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांवर कंत्राटदारांकडून राडारोडा; पालिका अधिकाऱ्यांचा आरोप

दरवर्षीच्या पावसात मुंबईची ‘तुंबई’ होत असली तरी, यंदा मेट्रोच्या कामांमुळे पूरस्थितीमध्ये भर पडल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे आजपर्यंत ज्या ठिकाणी पाणी साचले नव्हते अशा ठिकाणीही पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी साचले आणि रहिवाशांची दाणादाण उडाली. यामध्ये वांद्रे कुर्ला संकुल आणि वरळी या दोन भागांचा प्रामुख्याने समावेश आहे.

शहरात मंगळवारी झालेल्या प्रलयंकारी पावसामुळे मुंबई बुडितखात्यात गेली. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले. मात्र व्यावसायिक इमारती असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल परिसरातही पाणी साचले. यासाठी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. मात्र हे पाणी पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे नव्हे तर मेट्रोचे काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या चुकीमुळे साचल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. मुंबईत मंगळवारी दुपारी झालेला पाऊस व त्या दरम्यान असलेल्या भरतीमुळे पाण्याचा निचारा होऊ शकला नाही. मात्र संध्याकाळी पावसाचा जोर ओसरला व ओहोटीही सुरू झाली. मात्र तरीही पाण्याचा निचरा होत नव्हता. यासाठी जबाबदार ठरला तो पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीवर टाकलेला राडारोडा. वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात सुरू असलेल्या मुंबई मेट्रो-३च्या कामासाठी येथील पर्जन्यजल वाहिनीत बदल करण्यात येत आहेत. गणेशनगर, भारतनगर, धर्माधिकारी मार्ग, ज्ञानेश्वर मार्ग या परिसरातील पाण्याचा निचरा वाकोला नाल्यात होतो. मात्र हे पाणी बाहेर जाण्यासाठीचा मार्गच मेट्रोच्या कामामुळे बंद झाल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदारांनी बांधकामाचे साहित्य वाहिन्यांच्या तोंडाशी ठेवल्यामुळे या वाहिन्यांतून पाणी जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला.

यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाली. मात्र याबाबत अधिकृतपणे बोलण्यास पालिका अधिकारी तयार नाही. वांद्रे येथे राडय़ारोडय़ामुळे पाणी कमी होण्यात अडथळा आला. तो हटवल्यानंतर पाणी ओसरू लागले. मात्र, हा बांधकाम कचरा कोणी टाकला, याची माहिती नसल्याचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले.

मेट्रो ३ च्या सर्व कामांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर मान्सूनपूर्व पाहणी झाली होती. या पाहणीदरम्यान पालिकेने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्यात आले होते. मेट्रोचे काम चालू असलेल्या ठिकाणच्या सेवा वाहिन्यांच्या स्थलांतराची कामे, पाण्याचा निचरा करण्यासाठी सक्षम पंपांची व्यवस्था इत्यादीबाबत पूर्वनियोजन करण्यात आले होते. मंगळवारी अनुभवाला आलेल्या अतिवृष्टीसारख्या प्रसंगांना अधिक योग्य रीतीने तोंड देण्यासाठी महानगरपालिकेकडून यापुढेही काही सूचना प्राप्त झाल्यास त्याचे यथायोग्य पालन करण्यात येईल, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.