कामाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचू नये यासाठी २४१ पंप बसविणार

मुंबई : मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून गोंधळ उडू नये यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने (एमएमआरसी) तेथे तब्बल २४१ पाणी उपसा पंप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या वळविण्याची कामे हाती घेतली असून ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आश्वासन मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने बुधवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत दिले.

पावसाळा जवळ येत असून मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय होऊ नये या उद्देशाने सध्या शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी अजोय मेहता यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय बैठक बुधवारी पालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती.

सध्या मुंबईमध्ये विविध ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई मेट्रो र्लेल्वे महामंडळाने मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचू नये म्हणून २४१ पाणी उपसा करणारे पंप बसविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पालिकेने यंदा सखलभागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा करण्यासाठी मुंबईत तब्बल २९५ पाणी उपसा करणारे पंप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिका आणि मेट्रोचे मिळून एकूण ५३६ पाणी उपसा पंप बसविण्यात येणार आहे.

पाणी साचू शकेल अशा सखलभाग परिसरांची पालिका, मेट्रो आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पाहणी करून समन्वयाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

तसेच उभयतांमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या स्तरावर अखंड सुरू राहणारा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. पश्चिम उपनगरांमधील नाले आणि कल्व्हर्टच्या सफाईच्या कामाचा आढावाही या वेळी घेण्यात आला.

अतिवृष्टी झाल्यानंतर पालिकेचे अधिकारी पाणी साचणाऱ्या सखल भागांची पाहणी करण्यासाठी फिरत असतात. आता अशी परिस्थिती निर्माण झाल्यास एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे संबंधित अधिकारीही प्रत्यक्ष ठिकाणी आवश्यक ती कारवाई करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

जलवाहिन्या वळविण्याचे काम अंतिम टप्प्यात

मेट्रो रेल्वेच्या स्थानकांसाठी मुंबई सेंट्रल, कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक येथील पर्जन्य जलवाहिन्या वळविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून ते ३१ मेपर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी दिली. त्याचबरोबर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील, तसेच दहिसर ते अंधेरी दरम्यानच्या लिंक रोडवरील मेट्रो खांबांच्या सभोवताली पाणी साचू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची सूचना एमएमआरडीए आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाला या वेळी करण्यात आली.