मुंबई : मुंबईत रविवारी झालेल्या दुर्घटनेमुळे आता दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या रहिवाशांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अजूनही मोठय़ा संख्येने रहिवासी अतिधोकादायक इमारतीत राहात असून आता या रहिवाशांना शक्य तितक्या लवकर स्थलांतरित करण्याचे आव्हान मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळासमोर उभे ठाकले आहे.

दरवर्षी अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करून तेथील रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाते. त्यानुसार यावर्षी २१ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित झाल्या आहेत. यात ७१७ रहिवासी असून यापैकी १९६ रहिवाशांनी याआधीच तर २० रहिवासी संक्रमण शिबिरात रहावयास गेले आहेत. दरम्यान २४७ रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे आव्हान मंडळासमोर आहे. त्यानुसार या रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर त्यांना संक्रमण शिबिरेही देण्यात आली आहेत. पण अजूनही हे रहिवासी संक्रमण शिबिरात गेलेले नाहीत. आम्ही त्यांच्या स्थलांतरासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. चेंबूर-विक्रोळी दुर्घटना पाहता अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना शक्य तितक्या लवकर स्थलांतरित करणे आवश्यक आहे. त्याबाबत मुख्य अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली आहे.