किमतीमध्ये ३० टक्के कपातीचा निर्णय

घरांच्या वाढलेल्या किमतीमुळे दुरावलेल्या ग्राहकाला वळवण्यासाठी ‘म्हाडा’ने घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुंबई म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली.

म्हाडा लवकरच १ हजार १९४ घरांची सोडत काढणार आहे. त्यात वडाळा २७८, सायन प्रतीक्षा नगर ८३ घरे, मानखुर्द ११४, मुलुंड आणि गोरेगाव येथील घरांचा समावेश आहे. या सोडतीमधील घरांच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्यात येतील, असे सामंत यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत ‘म्हाडा’च्या घरांच्या किमती वाढल्यामुळे ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. मागील सोडतीत लोअर परळ येथील २८ सदनिका किंमत जास्त असल्यामुळे त्या घेण्यास सोडतविजेत्यांनी नकार दिला होता.  विक्री न झालेली अनेक घरे पडून होती. महाराष्ट्रात २४४१ घरांची विक्री झाली नाही. त्यामुळे ‘म्हाडा’ने घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

उच्च उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्पन्न गट यांच्यासाठीच्या घरांच्या किमतीमध्ये रेडीरेकनरनुसार अनुक्रमे ७० टक्के, ६० टक्के, ५० टक्के आणि ३० टक्के किंमतकपात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जुन्या घरांची सोडत काढताना कोकण मंडळाच्या धर्तीवर घरांची घसारा रक्कम काढून मग त्यांची सोडत काढण्यात येईल. यामुळे किमती किमान २० टक्क्यांनी कमी होतील, असेही सामंत यांनी सांगितले. टागोर नगरमधील आम्रपाली येथील १ कोटी १७ लाख ३२ हजारांचे घर केवळ ८२ लाख १२ हजार रुपयांना मिळू शकेल, असे ते म्हणाले. इतर जिल्ह्य़ांमधील घरांच्या किंमती २० ते ४७ टक्के कमी करण्यात येतील. तेथील बाजार भावाची पडताळणी करून घरांची किंमत निश्चि करण्यात येईल. एवढे करूनही ग्राहकांनी प्रतिसाद दिला नाही तर ही घरे पोलिसांना देण्यात येतील, असे सामंत म्हणाले.