‘म्हाडा’च्या मुंबईतील ९७० घरांच्या सोडतीसाठी आतुरतेने वाट बघणाऱ्या नागरिकांना अजून किमान दहा दिवस वाट बघावी लागणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस या घरांच्या सोडतीची जाहिरात येणे अपेक्षित असताना ही जाहिरात आलेली नसून ती येण्यास अजून विलंब लागणार आहे. कारण, नव्याने आर्थिक उत्पन्न गटांच्या मर्यादांचे निकष जाहीर झाले असताना हे निकष या घरांच्या सोडतीसाठी लागू होणार की नाही याचा निर्णय होणे बाकी असल्याने ही घरांची सोडत बाकी असल्याचे समजते आहे.

‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी घरांची सोडत काढण्यात येत असून या सोडतीची जाहिरात एप्रिल महिन्यात देण्यात येते व मे अखेरीस सोडत काढली जाते. मात्र, यंदा एप्रिल व मे हे दोनही महिने उलटून गेले असून अद्याप सोडतीची जाहिरातही काढण्यात आलेली नसून पुढील किमान आठवडाभर तरी ही जाहिरात येणार नसल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

त्यामुळे मुंबईतील चांगल्या भागांमध्ये असणाऱ्या एकूण ९७० घरांच्या या सोडतीला विलंबच होत चालल्याने घर घेऊ पाहणाऱ्यांच्या स्वप्नांचा हिरमोड होत आहे.

यंदा मे महिन्यात मुंबईतील गिरणी कामगारांच्या दुसऱ्या टप्प्यातील घरांची सोडत झाल्यामुळे हा उशीर झाल्याचे ‘म्हाडा’चे म्हणणे आहे. मात्र आता याबाबतची नवीनच कारणे पुढे येत असून नव्याने जाहीर केलेल्या आर्थिक उत्पन्न गटांच्या मर्यादा या सोडतीला लागू होतील की नाही याबाबत संभ्रम असल्याचे खुद्द गृहनिर्माणमंत्र्यांनीच एका पत्रकार परिषदेदरम्यान सांगितल्याने या सोडतीला झालेल्या उशिराचे कारण पुढे आले आहे. तसेच, घरांसाठी इच्छुक अर्जदारांचे अर्ज स्वीकारण्याचे सॉफ्टवेअरही अद्ययावत होत असल्याने विलंबात भर पडल्याचेही मेहता यांनी कबूल केले.

घरे कुठे?

सायन, प्रतीक्षानगर, मानखुर्द, मुलुंड, सायन, पवई, बोरिवली, शिंपोली, गोरेगाव, वर्सोवा, दहिसर, चांदिवली येथे ही घरे असून यात उच्च उत्पन्न गटांच्याही घरांचा समावेश आहे. तसेच, यातील काही घरे ही जुनी असून काही नवीन तर मुख्यमंत्री कोटय़ातील काही घरांचा यात समावेश आहे.

उत्पन्न मर्यादेवरून विलंब

मुंबईतील घरांच्या सोडतीची जाहिरात न निघाल्याबद्दल ‘म्हाडा’मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना विचारले असता ते म्हणाले, घरांची सोडत लवकरच होणे अपेक्षित असून येत्या दोन-तीन दिवसांत जाहिरात निघेल. कारण, नुकतेच केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या अनुषंगाने आम्ही आर्थिक उत्पन्न गटांच्या मर्यादेत बदल केले आहेत. मात्र, हे बदल या सोडतीपासून लागू होतील की पुढच्या सोडतीला लागू होतील याचा निर्णय सरकारदरबारी झाला की ही सोडत होऊ शकेल असे ते म्हणाले.

सॉफ्टवेअरचीही उशिरात भर

‘म्हाडा’तर्फे इच्छुकांचे अर्ज ऑनलाइन घेण्यात येतात. हे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचे सॉफ्टवेअरही अद्ययावत करण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात असल्याचेही मेहता यांनी कबूल केले. कारण, कोकण मंडळाच्या सोडतीवेळी या सॉफ्टवेअरवर ताण आला होता, त्यामुळे ते अद्ययावत करणे आवश्यक होते, त्याचे काम सुरू असल्याने या सोडतीला विलंब झाल्याचे ‘म्हाडा’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या वेळी, त्यांनी घरांच्या किमती ठरवण्यावरून उशीर होत नसल्याचेही स्पष्ट केले.