विशेष समिती अध्यक्षांचेही दौरे सुरू ; नेत्यांच्या नाले पाहणीमुळे कामकाजाचा खोळंबा
मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांपाठोपाठ विशेष समित्यांच्या अध्यक्षांनीही नालेसफाई पाहणी दौरे सुरू केले असून, त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांना आपापली कामे सोडून राजकीय नेत्यांची नाल्याकाठी उभे राहून वाट पाहण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर पालिकेच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनाही नालेसफाई दौऱ्यासाठी धावपळ करावी लागत आहे. करदात्या मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केलेले लाखो रुपये या नालेसफाई दौऱ्यांसाठी खर्ची पडत आहेत, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
मुंबईत छोटय़ा नाल्याची पालिकेच्या विभाग कार्यालयाच्या स्तरावर, तर मोठय़ा नाल्यांची कंत्राटदारांमार्फत सफाई सुरू होती. ३१ मे रोजी नालेसफाईची मुदत संपली. दरम्यानच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली होती. त्यानंतर सध्या पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली नालेसफाई पाहणी दौऱ्याचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर विशेष समित्यांच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीही नालेसफाईचे दौरे सुरू केले आहेत. नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात आपल्यासोबत पत्रकारांसाठी गाडी, पालिकेचा छायाचित्रकारही असावा असा हट्ट प्रत्येक जण करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पत्रकारांसाठी गाडी आणि छायाचित्रकाराची व्यवस्था करण्यासाठी पालिकेच्या जनसंपर्क विभागाला धावपळ करावी लागत आहे. राजकीय नेते मंडळी नाल्याची पाहणी करण्यासाठी येणार असल्यामुळे त्या त्या परिसरातील विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांसमवेत अन्य खात्यातील अधिकाऱ्यांना नाल्याकाठी उपस्थित राहावे लागत आहे. नेते मंडळी कोणत्या क्षणी पोहोचणार याची कल्पना नसल्यामुळे अधिकारी वर्गाला नाल्याकाठी तासन्तास वाट पाहत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे कार्यालयांतील अन्य कामांचा खोळंबा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दौऱ्याची तयारी..
नालेसफाईच्या दौऱ्यासाठी अध्यक्ष, पालिका अधिकारी आणि पत्रकारांसाठी गाडय़ांची व्यवस्था करावी लागते. एका छोटय़ा दौऱ्यासाठी पाच ते सहा वाहने, तर मोठय़ा दौऱ्यासाठी १० ते १२ वाहनांची व्यवस्था करावी लागते. त्याशिवाय पत्रकारांसाठी नाश्ता, भोजन, शीतपेय, बाटलीबंद पाणी आदींचा खर्च करावा लागतो. त्यामुळे या दौऱ्यांचा खर्च लाखो रुपयांच्या घरात जातो. पालिकेच्या खर्चातच हे दौरे काढले जातात.