पाच वर्षांत २२८४ बलात्काराच्या घटना

महिला आणि अल्पवयीनांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच पोलीस यंत्रणेकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या, तरी देशाची आर्थिक राजधानी आजही त्यांच्यासाठी असुरक्षित ठरत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मुंबईत २२८४ बलात्काराच्या, तर ६३७६ विनयभंगाच्या घटनांची नोंद झाली. यातील गंभीर बाब म्हणजे १८ वर्षांआतील पीडितांचे प्रमाण सर्वाधिक असून २०१५ साली बलात्काराच्या नोंद झालेल्या घटनांमध्ये ६३ टक्के संख्या १८ वर्षांआतील पीडितांची आहे. मुंबईतील हे भीषण वास्तव प्रजा फाऊंडेशनतर्फे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेच्या सद्य परिस्थितीवर सादर करण्यात आलेल्या अहवालातून दिसून येत आहे.

मुंबई पोलीस व शहरातील कायदा आणि सुव्यवस्था याबाबतची वार्षिक आकडेवारी दरवर्षी प्रजा फाऊंडेशनतर्फे प्रकाशित करण्यात येते. यंदा प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये मुंबईतील महिला व लहान मुलांच्या असुरक्षिततेत भर पडल्याचे वास्तव अधोरेखित करण्यात आले आहे. माहिती अधिकारातून मिळवण्यात आलेल्या माहितीवरून ही आकडेवारी देण्यात आली आहे. त्यात महिलांवरील बलात्कार आणि विनयभंग आदी गुन्ह्य़ांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे या अहवालावरून दिसते आहे.

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत बलात्काराच्या घटनांमध्ये होणारी वाढ शहाराबाबत चिंता व्यक्त करणारी असून यात महिला व मुले यांना सफर व्हावे लागत आहे. या गंभीर समस्येवर महाराष्ट्र शासन व पोलिसांनी तात्काळ पावले उचलावीत असे मत या वेळी प्रजा फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले. तर, बलात्काराच्या गुन्ह्य़ांमध्ये एफआयआर दाखल केल्यानंतर आरोपपत्र दाखल होईपर्यंत ९.२ महिने लागतात आणि सत्र न्यायालयांत निर्णयासाठी प्रकरण पोहचेपर्यंत २१.३ महिने लागतात. हे सगळेच वास्तव एकंदर गंभीर असून गृहविभागाचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रजा फाऊंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत मुंबई पोलिसांचे प्रवक्ते पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

अहवालातून उघड झालेले सत्य

१. उत्तर मध्य मुंबईमध्ये ९२८६ इतक्या सर्वाधिक गुन्ह्य़ांची नोंद असून या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी २०१५-१६ या वर्षांत गुन्ह्य़ांसंबंधी फक्त ६० प्रश्न विचारले.

२. अशी परिस्थिती असताना २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात भारती लवेकर, रामचंद्र कदम, सेल्वन तामिल यांनी गुन्ह्य़ांच्या संदर्भात एकही प्रश्न विचारला नाही.

३. मुंबई पोलिसांत ११ टक्के तपास अधिकाऱ्यांचा तर ५७ टक्के नियंत्रण कक्ष कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे.

४. या गुन्हेगारी आकडेवारीवरील माहिती जाणून घेण्यासाठी मुंबईतील २५ हजार नागरिकांचे मत प्रजा फाऊंडेशनने विचारात घेतले.

अहवाल काय सांगतो?

  • २०११-१२ ते २०१५-१६ या पाच आर्थिक वर्षांच्या काळात महिलांवरील बलात्काराच्या घटना उत्तरोत्तर वाढत गेल्या आहेत. २०११-१२ मध्ये १८७, २०१२-१३ मध्ये २९४, २०१३-१४ मध्ये ४३२ तर २०१४-१५ मध्ये ६४३ आणि २०१५-१६ मध्ये ७२८ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत तर अनुक्रमे याच वर्षांमध्ये ५५४, ७९३, १२०९ तर १६७५ आणि २१४५ अशा विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत.
  • २०१४ मध्ये लहान मुलांवरील बलात्काराच्या ६०९ घटना घडल्या असून २०१५ सालात ७१२ घटनांची नोंद झाली.
  • २०१४ व २०१५ मध्ये ६ वषार्र्खालील लहानांवरील अत्याचाराच्या घटना अनुक्रमे २५ व २६ असून ६ व १२ वर्षांदरम्यानच्या मुलांमधील अत्याचाराच्या घटना ६४ व ४९ आहेत. तर, १२ ते १६ वर्षांदरम्यानच्या मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ असून या दोन वर्षांत १३७ व १९३ अशा घटना घडल्या आहेत.
  • २०१४ मध्ये लहानांवरील बलात्काराचे हे प्रमाण ५६ टक्के होते तर २०१५ मध्ये हे प्रमाण ६३ टक्क्य़ांवर गेल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या वार्षिक आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्याचबरोबर मुंबईत महिला व मुलांची सुरक्षा अत्यंत धोक्यात आली आहे असे मत ३३ टक्के लोकांनी प्रजा फाऊंडेशनकडे व्यक्त केले आहे.