अभियांत्रिकीप्रमाणे राज्यातील सरकारी व खासगी महाविद्यालयांमधील पदव्युत्तर व्यवस्थापन (एमबीए-एमएमएस) अभ्यासक्रमांकरिता २०१६-१७मध्ये राबविली जाणारी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) चार फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे.

‘महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५’नुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या अधिनियमांच्या अनुषंगाने तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांकरिता प्रवेश प्रक्रियेचे नवे नियम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार अभियांत्रिकी, एमबीए-एमएमएस, औषधनिर्माण शास्त्र, वास्तुशास्त्र या पदवी अभ्यासक्रमांसाठी चार प्रवेश फेऱ्या घेण्यात येणार आहेत. गेल्या वर्षीपर्यंत या अभ्यासक्रमांकरिता तीन प्रवेश फेऱ्या घेण्यात येत होत्या. प्रवेशाकरिता अभ्यासक्रमाचे पर्याय देण्याच्या पद्धतीतही बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीच्या सुरवातीला आपल्या पसंतीक्रमानुसार अमर्याद विकल्प देता येतील. हा पसंतीक्रम पहिल्या तीन फेऱ्यांच्या जागावाटपाकरिता वापरण्यात येणार आहे. जागावाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांना फ्रीझ, स्लाइड आणि फ्लोट यापैकी एक पर्याय निवडता येणार आहे.

अशा होतील प्रवेश फेऱ्या

  • फ्रीझ म्हणजे विद्यार्थ्यांला वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घ्यायचा असून त्याला त्यापेक्षा चांगल्या पर्यायाची अपेक्षा नाही. जागा फ्रीझ केल्यानंतर विद्यार्थी दुसऱ्या व तिसऱ्या फेरीकरिता पात्र राहणार नाही.
  • स्लाइड याचा अर्थ विद्यार्थ्यांला वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घ्यायचा असून त्याच संस्थेमध्ये त्यापेक्षा चांगल्या विकल्पाची जागा मिळाल्यास तो घेणार आहे. असे विद्यार्थी दुसऱ्या व तिसऱ्या फेरीस पात्र असतील. एमबीए-एमएमएसकरिता स्लाइडचा पर्याय लागू राहणार नाही.
  • फ्लोट म्हणजे वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घ्यायचा असून त्यापेक्षा चांगल्या विकल्पाची जागा मिळाल्यास तो घेणार आहे. हे विद्यार्थी दुसऱ्या व तिसऱ्या फेरीला पात्र असतील.
  • ज्या उमेदवाराला पहिला विकल्प मिळाला आहे त्याला फ्लोट किंवा स्लाइड असा पर्याय निवडता येणार नाही. चौथ्या फेरीत सर्वच विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. त्या करिता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पसंतीक्रम भरायचा आहे. ज्यांना या फेरीपूर्वी जागावाटप झालेले नसेल किंवा ज्यांनी प्रवेश मिळाला असेल, पण नंतर रद्द केला असेल असे सर्व विद्यार्थी या फेरीसाठी पात्र असणार आहेत.