सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी भारताचा झेंडा जगात फडकावला. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावला. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

“युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. रणजितसिंह तुमचं मनापासून अभिनंदन! तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय”, असं लिहित राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे डिसले यांचे कौतुक केले.

आणखी वाचा- सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी काल यासंदर्भातली घोषणा केली. जगभरातील १४० देशातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनामधून अंतिम विजेता म्हणून डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केलं आहे. यामुळे ९ देशांमधल्या हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाईल. रणजितसिंह डिसले यांना मिळालेली रक्कम टीचर इनोव्हेशन फंडाकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- सोलापूरच्या शिक्षकाचा जगात डंका, तुकाराम मुंढेंनी ठोकला ‘सलाम’ ; म्हणाले…

पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील नऊ शिक्षकांना देण्याचे रणजितसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे विविध नऊ देशांतील हजारो शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते ‘टीचर इनोव्हेशन फंड’करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळेल. याबाबतची माहिती स्वतः डिसले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करीत असताना रणजितसिंह डिसले यांच्या सेवेची दखल जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सर्वप्रथम घेतली होती. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे डिसले यांना आपले काम जागतिक पातळीवर नेता आले.