फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने उघडलेल्या मोहिमेमुळे आता फेरीवाले आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्ता आणि विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्या डोक्यावर रॉडने वार करण्यात आले आहेत. फेरीवाल्यांनी केलेल्या या हल्ल्यात सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मालाडकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळते आहे. सुशांत माळवदे आणि इतर चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे. दुपारी ३.३० च्या सुमारास सुशांत माळवदेंवर हा जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या सुशांत माळवदेंवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.मनसे कार्यकर्ते आनंद सोनी यांनी त्यांच्या आणि सुशांत माळवदे यांच्या फेसबुक पेजवर रूग्णालयातील फोटो अपलोड करून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. मालाड स्टेशनबाहेर फेरीवाले बसले आहेत की नाही याची पाहाणी सुशांत माळवदे आणि इतर मनसे कार्यकर्ते करत होते त्याचवेळी हा हल्ला झाला आहे.

काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांना चिथावणी दिली होती असा आरोप आता मनसेकडून होतो आहे. संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात फेरीवाल्यांना हल्ला करण्यासाठी चिथावणी देण्यात आली त्यानंतर फेरीवाल्यांच्या मोठ्या जमावाने सुशांत माळवदे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर हल्ला केला असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. तसेच या हल्ल्याप्रकरणी संजय निरूपम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी केली.

दुसरीकडे काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असे म्हटले आहे. मनसेचे कार्यकर्ते खंडणी घेतात, फेरीवाल्यांवर हल्ला करतात अशी दादागिरी कशी खपवून घेतली जाईल? असा प्रश्न निरूपम यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे निरूपम विरूद्ध मनसे असा वाद आता आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

मुंबईतील एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर झालेल्या भाषणामध्ये मुंबईतील रेल्वे स्थानके आणि पादचारी पूल तसेच रेल्वे स्थानकांचा बाहेरचा परिसर या ठिकाणाहून फेरीवाले हटवण्याचे निवेदन त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले होते. १५ दिवसात रेल्वेने फेरीवाले हटवले नाहीत तर मनसे कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने फेरीवाल्यांना हटवतील असाही इशारा दिला होता. १५ दिवसांची मुदत उलटल्यानंतर  मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण, ठाणे आणि इतर अनेक ठिकाणी ‘तोडफोड’ आंदोलन करत फेरीवाल्यांना मनसे स्टाईल दणका दिला. ज्यानंतर आता फेरीवल्यांकडून मनसेवर हल्ला करण्यात आला आहे.