अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. कांदिवलीमध्ये बुधवारी सकाळी इंग्रजी पाट्यांवर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली त्याचबरोबर धारदार वस्तूच्या साह्याने इंग्रजीत असलेले बॅनर्सही फाडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी पाट्या लावल्याच पाहिजेत’, अशी घोषणाही देण्यात येत होती.
कांदिवलीमध्ये बुधवारी सकाळी जमावाने आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अचानक इंग्रजी पाट्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही जणांनी इंग्रजीत मजकूर असलेले बॅनर्स फाडले. कार्यकर्त्यांकडे मनसेचे झेंडे होते आणि त्यांच्याकडून मराठी पाट्यांच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात येत होत्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काहीवेळ परिसरात घबराट पसरली होती. काहींनी आपली दुकाने लगेचच बंद केली. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबई महापालिकेची निवडणूक होते आहे. त्यापार्श्वभूमीवर मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.